esakal | लोकबिरादरीतही शांतिनिकेतन, विद्यार्थी झाडाखाली गिरवतात धडे
sakal

बोलून बातमी शोधा

gadchiroli

एका केंद्रावर दोन शिक्षक याप्रमाणे शासनाच्या लॉकडाउन नियमांचे पालन करीत, सामाजिक अंतर राखून, तोंडावर मास्क लावून 20 विद्यार्थ्यांचा एक वर्ग याप्रमाणे गावांतील मोकळ्या जागेत झाडाखाली विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत.

लोकबिरादरीतही शांतिनिकेतन, विद्यार्थी झाडाखाली गिरवतात धडे

sakal_logo
By
लीलाधर कसारे

भामरागड (गडचिरोली) : निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण चांगल्याप्रकारे होते. वाढत्या वयात निसर्गाशी जवळिक साधली जाते. बालकांचा आणि निसर्गाचा ऋणानुबंध जुळतो म्हणून रविंद्रनाथ टागोरांनी बंगालमध्ये शांतिनिकेतन सुरू केले. आता परत तंत्रज्ञानाच्या इतक्‍या प्रगतीनंतरही पुन्हा एकदा निसर्गाच्या सान्निध्यात शाळा भरविण्याची वेळ कोरोनाने आणली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे शाळांच्या अंतिम शैक्षणिक सत्रापासून राज्यभरातील शाळा बंद आहेत. या पुढेही कधी सुरू होणार याचा नेम नाही .त्यामुळे शहरात खासगी शिकवणी वर्ग घेणाऱ्या संचालकांनी तसेच काही नामांकित शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले. मात्र, इंटरनेटची सोय नसल्यामुळे ज्येष्ठ समाज सेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी आपल्या लोक बिरादरी प्रकल्पातील विद्यार्थ्यासाठी "शिक्षण तुमच्या दारी" हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. भामरागड तालुक्‍यातील दुर्गम गावात जाऊन तेथील शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत.
यंदा कोविड-19 मुळे जग हादरून गेले आहे. सरकारने संचारबंदी लागू केली. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची द्वितीय सत्रांत परीक्षा न घेता सुट्टया जाहीर करण्यात आल्या. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मार्चमध्ये घरी सोडण्यात आले. पुढे शाळा कधी सुरू होणार याचीही शाश्वती नाही. चार ते पाच महिन्यांच्या सुट्ट्‌यांमध्ये विद्यार्थ्यांची शिक्षणाबद्दलची लिंक तुटू नये, शिक्षण प्रक्रिया अविरत सुरू राहावी यासाठी लोक बिरादरी आश्रम शाळेचे संचालक अनिकेत आमटे यांच्या प्रेरणेने व आश्रम शाळेच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे यांच्या कल्पनेतून व पुढाकाराने "शिक्षण तुमच्या दारी' हा अभिनव उपक्रम दुर्गम गावामध्ये राबविला जात आहे.
सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे येथील शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाता आले नाही. त्यामुळे पहिली ते नववी आणि 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांचे शिकवणी वर्ग प्रत्यक्ष त्यांचे गावी जाऊन घ्यायचे ठरले. त्यासाठी पहिली ते नववीसाठी तालुक्‍यात 12 केंद्र व 10 वी ,12 वीसाठी 5 केंद्र निवडण्यात आले.
तेंदुपत्यांचा हंगाम संपताच आणि लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळताच शिकवणी वर्गाला सुरुवात करण्यात आली. प्रत्येक केंद्रावर परिसरातील 2 ते 3 किलोमीटर अंतरावरून गावांतील विद्यार्थी पालकांसोबत येतात. एका केंद्रावर दोन शिक्षक याप्रमाणे शासनाच्या लॉकडाउन नियमांचे पालन करीत, सामाजिक अंतर राखून, तोंडावर मास्क लावून 20 विद्यार्थ्यांचा एक वर्ग याप्रमाणे गावांतील मोकळ्या जागेत झाडाखाली विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत.

सविस्तर वाचा - खाकी वर्दीतील लव्हबर्डची चर्चा जोरात, वरिष्ठांपर्यंत पोहोचले प्रकरण अन...

90 टक्‍के विद्यार्थी उपस्थिती
पहिली वी ते नववीच्या विद्यार्थ्यांना बेसिक ज्ञान, गोष्टी, खेळ, लेखन, वाचन, गणितीय क्रिया, इंग्रजी शिक्षण देण्यात येत आहे तर 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविला जात आहे. विद्यार्थ्यांचे वर्ग सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत घेण्यात येत असून गावागावात लोक बिरादरीतर्फे सुरू असलेले शिकवणी वर्ग शाळा सुरू होईपर्यंत सुरूच राहणार आहेत. प्रत्येक शिकवणी वर्गाला 95 ते 100 टक्‍के विद्यार्थी उपस्थित राहतात हे विशेष! भामरागड तालुक्‍यातील लोक बिरादरी आश्रम शाळा, हेमलकसातर्फे यंदा पहिल्यांदाच सुरू केलेल्या एका नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.