
आज सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी आझाद मैदानात मोर्चा काढला. तसेच विदर्भातून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने मोर्चा काढला.
नागपूर : मुंबईच्या आझाद मैदानातून राजभवनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थित मोर्चा काढण्यात आला, तर इकडे विदर्भात भंडारा येथे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चा काढला. विशेष म्हणजे हे दोन्ही मोर्चे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढण्यात आले. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकाच दिवशी, एकाच वेळी मोर्चे काढत आहेत आणि तेसुद्धा शेतकऱ्यांसाठी. त्यामुळे आता शेतकरी खरंच सुखी होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या मोर्चात महाविकास आघाडीचे जवळपास सर्व प्रमुख नेते सहभागी झाले होते. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात हा मोर्चा होता. आझाद मैदानावरील सभा आटोपल्यानंतर मोर्चाने राजभवनावर जाऊन राज्यपालांना निवेदन देण्याचे नियोजन मोर्चेकऱ्यांनी केले होते. पण ऐन वेळी राज्यपाल गोव्याला निघून गेले. त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यासाठी राज्याच्या राज्यपालाजवळ वेळ नाही काय, असा सवाल करीत पवारांनी राज्यपालांवर तोफ डागली. राज्याच्या इतिहासात असे राज्यपाल महाराष्ट्राला मिळालेले नाही, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करताना पवार म्हणाले की, शेती कायदा करणाऱ्या समितीमध्ये सर्व पक्षांचे लोक असतात. करावयाच्या कायद्यावर सांगोपांग चर्चा होते. पण येथे केंद्र सरकारने कुठलीही चर्चा न करता कायदा अस्तित्वात आणला. पंतप्रधानांनी संसदीय पद्धतच उद्ध्वस्त केली. हा घटनेचा अपमान आहे. जे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांना आता लोक रस्त्यावर उतरून उद्ध्वस्त करतील, असा घणाघात पवार यांनी केला.
हेही वाचा - '...तर काँग्रेस अन् राष्ट्रवादीमधील अर्धे नेते तुरुंगात जातील'
इकडे पूर्व विदर्भाच्या भंडारा जिल्ह्यातून राज्य सरकारवर हल्लाबोल करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील सत्ताधारी शेतकऱ्यांना भरकटवत आहेत. धान खरेदी केंद्रांवरील भ्रष्टाचार बाहेर आला, तर भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अर्धे नेते तुरुंगात जातील. सत्तापक्षातील नेते आणि त्यांच्या चेले चपाट्यांनी धान खरेदी केंद्रांवरून मोठा मलिदा लाटला आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मानवतेला लाजवणारी घटना घडली. पण सरकारने त्यावर केवळ थातूरमातूर कारवाई केली. आम्ही मोर्चा घोषीत केल्यावर अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली. १० नवजात बालके आगीत होरपळून, गुदमरून मरण पावली, त्यांच्या मातापित्यांचे अश्रू अजून सुकलेले नाहीत. अन् महाराष्ट्र सरकारची अवस्था इतकी काही वाईट नाही, की त्यांना १०-१० लाख रुपयेही नाही देऊ शकणार. त्या मातांच्या, शेतकऱ्यांच्या संवेदना हे सरकार समजू शकणार नाही. हे बेईमानांचं सरकार जोपर्यंत हटणार नाही, तोपर्यंत आमचा संघर्षही संपणार नाही, असे फडणवीस म्हणाले.