esakal | आदर्श शाळांची श्रेयासाठी अदलाबदल, शिक्षण समितीने घेतला ठराव
sakal

बोलून बातमी शोधा

opposition criticism that exchange of ideal school only for credit in chandrapur

यूडायसच्या आधारे विद्यार्थी, विद्यार्थी संख्या आणि भौतिक सुविधेचा अभ्यास करून राज्यातील जिल्हा परिषदेतील शाळांना आदर्श करण्याचा निर्णय घेतला. यूडायसच्या आधारे आदर्श शाळांची निवड राज्या शासनाने केली.

आदर्श शाळांची श्रेयासाठी अदलाबदल, शिक्षण समितीने घेतला ठराव

sakal_logo
By
श्रीकांत पेशट्टीवार

चंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या हेतूने राज्य शासनाने अलीकडेच प्रत्येक जिल्ह्यांतील आदर्श शाळा जाहीर केल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील पंधरा आदर्श शाळांची यादी जाहीर करण्यात आली. यादीत क्षेत्रातील गावांतील शाळा नसल्याचे पाहून सत्ताधाऱ्यांनी चक्क आदर्श शाळांची अदलाबदल केल्याचा प्रकार समोर आला. शिक्षण समितीने तसा ठरावही घेतला आहे. दरम्यान, श्रेय लाटण्यासाठी आदर्श शाळांची अदलाबदल करण्यात आल्याची टीका विरोधकांनी केली आहे. 

हेही वाचा - वाघ बघायचाय? पेंच- ताडोब्यात होतेय हमखास दर्शन; ही आहे...

यूडायसच्या आधारे विद्यार्थी, विद्यार्थी संख्या आणि भौतिक सुविधेचा अभ्यास करून राज्यातील जिल्हा परिषदेतील शाळांना आदर्श करण्याचा निर्णय घेतला. यूडायसच्या आधारे आदर्श शाळांची निवड राज्या शासनाने केली. निवड करण्यात आलेल्या आदर्श शाळांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्‍यातील सोनापूर (देशपांडे), भद्रावती तालुक्‍यातील आष्टा, जिवती तालुक्‍यातील चिरोली बू, कोरपना तालुक्‍यातील खिर्डी, पोंभुर्णा तालुक्‍यातील आंबेधानोरा, राजुरा तालुक्‍यातील चुनाळा, सावली तालुक्‍यातील पाथरी, सिदेंवाही तालुक्‍यातील देलनवाडी, चंद्रपूर तालुक्‍यातील चिंचाळा, बल्लारपूर तालुक्‍यातील विसापूर, ब्रह्मपुरी तालुक्‍यातील देऊळगाव, चिमूर तालुक्‍यातील हिरापूर, मूल तालुक्‍यातील जुनासुर्ला, नागभीड तालुक्‍यातील नवखळा, वरोरा तालुक्‍यातील सालोरी या गावांतील जिल्हा परिषद शाळांचा आदर्श शाळेच्या यादीत समावेश करण्यात आला होता. मात्र, यातील काही गावे सत्ताधाऱ्यांच्या क्षेत्रातच येत नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आदर्श शाळांची अदलाबदल करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. शिक्षण समितीने शाळांच्या अदलाबदलीचा ठराव घेऊन या चर्चेलाच पूर्णविराम दिला आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या यादीत ऐनवेळी बदल करण्यात आल्याने विरोधकांसह त्या-त्या शाळांतील गावकरी संतापून आहेत. 

हेही वाचा - Big Breaking : वाढदिवस साजरा करायला गेले, पण वाटतेच...

शिक्षण समितीने घेतलेल्या ठरावात बल्लारपूर तालुक्‍यातील विसापूरऐवजी नांदगाव (पोडे), ब्रह्मपुरी तालुक्‍यातील देऊळगावला डावलून तोरगाव (बूज), चिमूर तालुक्‍यातील हिरापूरऐवजी खडसंगी, मूल तालुक्‍यातील जुनासुर्लाऐवजी दाबगावमक्ता, नागभीड तालुक्‍यातील नवखळाऐवजी बोंड, तर वरोरा तालुक्यातील सालोरीऐवजी खेमजई येथील जिल्हा परिषद शाळेची निवड केली. स्थायी समितीच्या सभेत आदर्श शाळांचा विषय काँग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर यांनी उपस्थित केला होता. मात्र, त्यावेळी त्यांच्या प्रश्‍नाला बगल देण्यात आली. त्यानंतर शिक्षण समितीच्या सभेत आदर्श शाळांची गावे बदलण्यात आली. तसा ठरावही घेण्यात आला. दरम्यान, यादीत बदल करण्याचे अधिकार शिक्षण समितीला आहेत. ते तसे करू शकतात, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. 

हेही वाचा - मराठी पाऊल पडते पुढे! महाराष्ट्राची युद्धकला आता जाणार मध्यप्रदेशात; महिला...

गटनेत्यांचे गाव हायजॅक -  
काँग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर यांच्या क्षेत्रात हिरापूर हे गाव येते. आदर्श शाळेच्या यादीत हिरापूरचा आधी समावेश होता. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीच्या सभापती रेखा कारेकार यांच्या क्षेत्रातील एकही गाव यादीत नव्हते. त्यामुळे त्यांनी हिरापूरऐवजी खडसंगीला पसंती दिल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे.

loading image