esakal | कोरोनामुळे सर्व धंदे झाले लॉकडाऊन, मात्र हा धंदा होता तेजीत... 
sakal

बोलून बातमी शोधा

online fraud

परतवाडा येथे टेलरिंगच्या व्यवसाय करणाऱ्या अफरोज जहॉं सय्यद नसीम यांना 28 मे रोजी एका मोबाईलधारकाने फोन करून केबीसीकडून 25 लाखांची लॉटरी लागल्याचे सांगितले.

कोरोनामुळे सर्व धंदे झाले लॉकडाऊन, मात्र हा धंदा होता तेजीत... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती  : कोरोनाच्या संकटात सर्वकाही लॉकडाउन असले, तरी ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांचा धंदा मात्र तेजीत सुरू आहे. त्यांच्या धंद्यात कुठलीही मंदी नाही. या काळात पुन्हा जिल्ह्यातील दोघांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. टेलरिंगचा व्यवसाय करणाऱ्यांकडून 50 हजार रुपये, तर एका युवकाकडून 32 हजार 708 रुपये लुबाडले गेले. 

परतवाडा येथे टेलरिंगच्या व्यवसाय करणाऱ्या अफरोज जहॉं सय्यद नसीम यांना 28 मे रोजी एका मोबाईलधारकाने फोन करून केबीसीकडून 25 लाखांची लॉटरी लागल्याचे सांगितले. लॉटरीचे पैसे खात्यात जमा करण्यापूर्वी काही बाबींची पूर्तता करण्याचा सल्ला तोतयाने अफरोज जहॉं यांना दिला. रक्कम पाठविण्यापूर्वी जीएसटीचे 50 हजार रुपये द्यावे लागतील, अशी बतावणी केली. ही रक्कम पाठविण्याकरिता तोतयाने एक बॅंकखाते क्रमांक पाठविला. अफरोज जहॉं याने पन्नास हजार रुपयांची रोकड त्या बॅंकखात्यात जमा केली. परंतु ज्याने जीएसटीच्या नावाने पैसे मागितले त्याने त्याचा मोबाईल क्रमांक बंद केला. अफरोज जहॉं यांनी ग्रामीणच्या सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यावर संबंधित क्रमांकाच्या मोबाईलधारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

अवश्य वाचा-  विदर्भातील पाच विद्यार्थिनी अडकल्या कझाकिस्तानात; मायदेशी परतण्याची लागली  अोढ

त्याचप्रमाणे 28 मे रोजीच मोर्शी तालुक्‍यातील हिवरखेड येथील रहिवासी व खासगी नोकरीत असलेल्या सचिन हरिभाऊ होले यांना एका मोबाईलवरून तोतयाने फोन केला. फोन पे कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून रिवॉर्ड (गिफ्ट) लागल्याची बतावणी केली. त्यासाठी टू. कॉन्टॅक्‍टमध्ये जाऊन अमाउंट सेटवर क्‍लिक करण्यास सांगितले. सचिन होले यांनी सांगितल्याप्रमाणे वर्तन केले. काही मिनिटात त्यांच्या आयसीआयसीआय बॅंकेच्या खात्यामधून 32 हजार 708 रुपयांची रोख रक्कम अनोळखी व्यक्तीने दुसऱ्या खात्यात वळती करून फसवणूक केली. होले यांच्या तक्रारीवरून ग्रामीण सायबर पोलिसांनी मोबाईलधारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. 

गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी 

लॉकडाउनच्या अडीच महिन्यांच्या काळात जेवढे ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे घडले, त्यापैकी गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण 25 टक्केही नाही. अशा गुन्ह्यांचा तपास अवघड असतो. एवढेच पोलिसांकडून वारंवार सांगितले जाते. 

नागरिक करतात वारंवार चुका 

अनोळखी व्यक्तीसोबत ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना, त्याची विश्‍वासार्हता तपासल्याशिवाय असे व्यवहार करू नये. गोपनीय माहिती शेअर करू नये. असे वारंवार सायबर पोलिसांकडून आवाहन केले जाते. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा घटना वाढत असल्याचे दिसून येते. 
 

loading image
go to top