कैमूल गावात इलेक्‍ट्रॉनिक काट्याऐवजी जुन्याच मापाने धानखरेदी, ४० किलो वजनाच्या गोणीत ४१ किलो धान्य टाकून एक किलोची लूट

नंदकिशोर वैरागडे
Wednesday, 30 December 2020

४० किलो धान्यामागे एक ते दीड किलो धान्य जास्त घेतले जाते. विरोध केला तर धान्य घेत नाही, असे सांगितले जात असल्याने उगाच अडचण नको म्हणून शेतकरी गप्प बसतात. जर एका 40 किलो वजनाच्या गोणीमागे एक किलो तर ५०० गोण्यांमागे ५०० किलो, अशा प्रकारे ही लूट सुरू आहे.

कोरची (जि. गडचिरोली) : धानखरेदी केंद्रावर इलेक्‍ट्रॉनिक वजन ठेवण्याची तरतूद असतानाही तालुक्‍यातील कैमूल गावात जुन्याच पद्धतीच्या तराजूच्या मापाने धान्य खरेदी होत आहे. यात ४० किलो वजनाच्या गोणीत ४१ किलो धान्य टाकण्यात येत असून प्रत्येक गोणीमागे एक किलोची लूट होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

सध्या धान कापणीनंतर मळणीचे काम सुरू असून शेतकरी थेट धान्य विकण्यासाठी आदिवासी महामंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध संस्थांवर केंद्रात जाऊन धान विक्री करत आहेत. कोरची तालुक्‍यापासून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कैमूल गावातील धान्य खरेदी केंद्रावर एका गोणीमागे एक किलो धान्य जास्त घेत असल्याची ओरड होत आहे.

अवश्य वाचा : नागपुरातील हिंगणा एमआयडीसीतील फर्निचर कंपनीला भीषण आग, परिसरात आग पसरण्याची भीती

कैमुल गावातील धान खरेदी केंद्रावर चक्क ४० किलो वजनाच्या गोणीमध्ये ४१ किलो धान्य टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरची तालुका नक्षलग्रस्त भागात मोडतो. तालुक्‍यापासून कैमूल हे गाव २२ किलोमीटर अंतरावर आहे. एकाधिकाराअंतर्गत आदिवासी महामंडळाच्या वतीने तालुक्‍यात विविध संस्थेच्या धान्य खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी केले जाते. त्यासाठी धान्य खरेदी केंद्रावर इलेक्‍ट्रॉनिक वजन ठेवण्याची तरतूद असताना जुन्याच मापाने खरेदी सुरू होती.

याबाबत विचारणा केली असता, इलेक्‍ट्रॉनिक वजन बिघडले आहे. त्यामुळे जुन्याच काट्याने धान्य खरेदी केले जाते, असे सांगण्यात आले. हे जरी सत्य असले; तरीही शेतकऱ्यांची लूट होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. ४० किलो धान्यामागे एक ते दीड किलो धान्य जास्त घेतले जाते. विरोध केला तर धान्य घेत नाही, असे सांगितले जात असल्याने उगाच अडचण नको म्हणून शेतकरी गप्प बसतात. जर एका 40 किलो वजनाच्या गोणीमागे एक किलो तर ५०० गोण्यांमागे ५०० किलो, अशा प्रकारे ही लूट सुरू आहे. त्यामुळे ही लूट थांबविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जाणून घ्या  :  घुग्घुसवासियांचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार, पालिकेसाठी सर्वपक्षीय चक्काजाम

संस्थाचालकाचा विचित्र खुलासा

या गावात जाऊन संस्थाचालक यांना याबाबतची अधिक विचारणा केली असता आमच्या वरिष्ठ कार्यालयातूनच तसा आदेश आहे. या ठिकाणी तहसीलदारांनी भेट दिली असून त्यांनीसुद्धा असेच धान्य घेण्याचे सांगितले आहे. त्यामुळे आम्ही तशीच मोजणी करून धान खरेदी करीत आहोत. धान घेण्यासाठी जी गोणी वापरली जाते तिचे वजन एक किलो असते. त्यामुळे ४१ किलो धान्य जादा घेतो, असे संस्थाचालक मडावी यांनी सांगितले. त्यांच्या या विचित्र खुलाशाने पाणी कुठेतरी मुरत असल्याची शंका व्यक्त होत आहे.
 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: paddy was bought in the old wieghts In the village of Kaimul