esakal | पालकांनो, तुमच्या मुलांकडे लक्ष देताय ना? तरुणांमध्ये वाढत चाललयं 'या' घातक व्यसनांचं प्रमाण   
sakal

बोलून बातमी शोधा

Parents have to save their children from Addiction Latest News

साकोली शहर हे राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असून येथून छत्तीसगड मध्य प्रदेशच्या सीमा जवळच आहेत. नागपूर महानगर काही अंतरावर असल्याने परराज्यातील अवैध व्यावसायिकांचा शहरात संपर्क सुरू आहे.

पालकांनो, तुमच्या मुलांकडे लक्ष देताय ना? तरुणांमध्ये वाढत चाललयं 'या' घातक व्यसनांचं प्रमाण   

sakal_logo
By
रमेश दुरुगकर

साकोली (जि. भंडारा) ः  सध्या गांजा, हुक्का पार्लर, जुगार क्‍लब, अवैध दारूविक्री, अवैध लॉटरी व सट्टा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. विशेष म्हणजे कॉलेजमधील तरुणांमध्ये याची क्रेझ आहे. पालकांच्या दुर्लक्षामुळे मुलांमध्ये असे प्रकार वाढत चालले आहेत. 

साकोली शहर हे राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असून येथून छत्तीसगड मध्य प्रदेशच्या सीमा जवळच आहेत. नागपूर महानगर काही अंतरावर असल्याने परराज्यातील अवैध व्यावसायिकांचा शहरात संपर्क सुरू आहे. त्यांच्याकडून मादक पदार्थांची विक्री सुरू आहे. लॉकडाउनमुळे महाविद्यालये बंद असली; तरी येथे शिकणाऱ्या परप्रांतीय विद्यार्थ्यांचे संपर्क आहेत. मागील एक वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक व्यवसाय उद्‌ध्वस्त झाल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. अशातच तरुणवर्ग अंमली पदार्थांच्या व्यसनात अडकल्याचे दिसून येत आहे.

जाणून घ्या - 'त्या' चौघांचे मृतदेह बघून आई-वडिलांनी फोडला टाहो; हिवरा-हिवरी गावात पसरली शोककळा; सरपंचांनाही अनावर झाले अश्रू

शहरातील सामसूम परिसर, नागझिरा रोडवरील हॉटेल्स, लाखांदूर रोडवरील पानटपऱ्या, पाथरी तलाव परिसर, सेंदूरवाफा परिसरातील पानटपऱ्या, नर्सरी कॉलनीचा पहाडी परिसर, जुने बसस्थानक परिसर या ठिकाणी गांजा विक्रेत्यांनी आपले संपर्क केंद्र केले असल्याचे बोलले जाते. गांजा विक्रीचा व्यवसाय चालता-फिरता केला जात असून शहरातील युवावर्ग व्यसनाधीन होत आहेत. चार सिरा गांज्याची पुडी 150 ते 200 रुपयांत सहज शौकिनांना उपलब्ध होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस व्यसनाधिनांची संख्या वाढत आहे.

मोबाईलच्या माध्यमातून सट्टा व ऑनलाइन लॉटरीमुळे अनेकांना जुगाराचा नाद लागल्याने ते आर्थिकदृष्ट्या बर्बाद होत आहेत. साकोलीजवळील मोहघाटा हे अवैध मोहफुलाच्या हातभट्टीच्या दारू निर्मितीचे मोठे केंद्र आहे. तेथून मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा पुरवठा शहरात व ग्रामीण भागात केला जातो. यामुळे साकोली शहरात अवैध दारूविक्री राजरोसपणे सुरू आहे.

अवैध व्यवसाय जोरात

शहरात नागझिरा रोडवर हुक्का पार्लर आणि इतर ठिकाणी असलेल्या लॉटरी सेंटरवर युवकांचा वावर वाढत आहे. दोन ठिकाणी जुगार क्‍लब सुरू असल्याची चर्चा आहे. या अवैध केंद्रांकडे तरुणाई आकर्षित होत आहे. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवैध व्यवसाय जोरात सुरू आहे. त्यामुळे शहरातील पालकवर्गात चिंता वाढली आहे. यासंबंधात प्रशासनाने कठोर पावले उचलून अवैध व्यावसायिकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

नक्की वाचा - अनेक दिवसांपासून बंद असलेल्या घराचं शेजाऱ्यांनी उघडलं दार; पलंगाजवळील दृश्य बघून भल्याभल्यांचा उडाला थरकाप 

युवापिढीने जबबदारीची जाणीव ठेवावी
व्यसनाच्या प्रवाहात आपले आयुष्य न संपविता युवापिढीने समाजाप्रती आपल्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवायला पाहिजे. व्यसनाधिन रुग्णांना आरोग्य सुधारण्यासाठी लागणारा सल्ला अथवा उपचार सर्व डॉक्‍टरांकडून निःस्वार्थपणे केला जाईल.
- डॉ. राजेश चंदवानी
सचिव, साकोली डॉक्‍टर असोसिएशन.

संपादन - अथर्व महांकाळ