पार्किंगच्या जागेचा व्यावसायिक वापर; अनेक इमारतींचे वाहनतळ कागदावरच 

illegal parking
illegal parking

यवतमाळ : व्यावसायिक इमारत उभारत असताना वाहनतळांची स्वतंत्र व्यवस्था उभारणे गरजेचे आहे. नगरपालिका प्रशासनाकडून नाहरकत प्रमाणपत्र घेताना तशा पद्धतीची अटदेखील घालण्यात आलेली असते. मात्र, तरीदेखील शहरामधील मोजक्‍या इमारती वगळल्यास अनेकांनी पार्किंगच्या जागेचा व्यावसायिक वापर केल्याचे दिसून येत आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाकडूनही दुर्लक्ष होत असून, यात मोठ्या इमारती, खासगी रुग्णालये व व्यापारी संकुलांचा समावेश आहे. 

यवतमाळ शहरात अनेक इमारती आहेत की, ज्यांनी वाहनतळांची निर्मितीच केलेली दिसत नाही. वाहनतळाच्या जागेचा वापर व्यावसायिक पद्धतीनेच केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना वाहने उभी करताना मोठ्या प्रमाणात कसरतच करावी लागत आहे. रस्त्यावर वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. परिणामी दररोज वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. 
शहरातील दत्त चौक, मुख्य बाजारपेठ, इंदिरा गांधी मार्केट, टांगा चौक, धान्य बाजार मार्ग अशा अनेक ठिकाणी वाहनतळाचा प्रश्‍न नागरिकांना भेडसावत आहे. 

शहरात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. नगरपालिकेकडून परवानगी घेताना वाहनतळाची मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. तशी रीतसर परवानगीदेखील घेतली जाते. प्रत्यक्षात मात्र, या जागेचा वापर वाहनतळासाठी न करता व्यावसायिक पद्धतीनेच केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार सर्रासपणे शहरात होताना दिसून येत आहे. त्यामुळेच रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे. 

शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढतच आहे. परिणामी व्यावसायिक इमारती मोठ्या प्रमाणात तयार करण्यात येत आहे. या ठिकाणी तळमजल्यावर वाहनांसाठी जागा असणे आवश्‍यक आहे. मात्र, या जागेचा वापर दुकानांसाठी केला जात असल्याचे प्रकारही समोर येत आहेत. काही ठिकाणी व्यावसायिक वापर नसला तरी इतर कामांसाठी ही जागा वापरली जात आहे. परिणामी, त्या ठिकाणी कामानिमित्त आलेल्या वाहनचालकांना रस्त्यावरच वाहने ठेवावी लागत आहेत. 

बेसमेंटमध्ये दुकाने

यवतमाळ शहरात तयार करण्यात आलेल्या काही इमारतींमध्ये बेसमेंट आहेत. मात्र, या ठिकाणचा उपयोग गाळे काढून व्यवसायासाठी केला जात आहे. संपूर्ण इमारतींमध्ये वाहनतळाची जागाच नसल्याने नागरिकांना रस्त्यावर वाहने उभी करण्याची वेळ आली आहे. वाहतुकीला अडथळा झाल्यास वाहतूक पोलिस चलान करीत आहेत. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने शहरात पार्किंग स्पॉट तयार करून देण्याची मागणी केली जात आहे.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com