'अपयशातच दडलाय यशाचा पासवर्ड'..असे का म्हणताहेत यवतमाळ जिल्हा परिषदेचे नवे सीईओ ..वाचा सविस्तर  

password of success is into the failure said new CEO of yavatmal ZP
password of success is into the failure said new CEO of yavatmal ZP

यवतमाळ : अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे असे म्हणतात. मात्र काही जणांना झटपट यश मिळवायचे असते. त्या नादात अनेकांना सतत अपयशाचा सामना करावा लागतो. मात्र अपयशातच यशाचा पासवर्ड दडला आहे, असे म्हणताहेत यवतमाळ जिल्हा परिषदेचे नवे सीईओ डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ. सीईओ म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर मंगळवारी त्यांनी दैनिक ‘सकाळ’शी संवाद साधला. 

 ‘डॉक्टर, अभियंता, जिल्हाधिकारी झाले म्हणजे तुम्ही खूप यशस्वी झाले असे नाही. करिअर करण्याच्या वाटा विस्तीर्ण आहेत. तुम्ही त्यात खर्‍या जीवनाचा आनंद शोधू शकता. युपीएससीची तयारी करीत असताना दोन वेळा अपयश आले. पुन्हा जिद्दीने प्रयत्न करून आयएएस उत्तीर्ण झालो. खर्‍याअर्थाने अपयशातच सक्सेस पासवर्ड दडला आहे’, असे मत जिल्हा परिषदेचे नवे सीईओ डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी व्यक्त केले.

अपयश आले म्हणून खचून जाऊ नका 

अपयश आले म्हणून खचून जाऊ नये, हा काळ खूप कठीण असतो. अशावेळी कुटुंबातील सदस्यांनी पाल्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. त्यातून मानसिक मनोबल वाढते. जिद्द, कष्ट व मेहनतीची सांगड घालून तुम्हाला हवे असलेले यश मिळविता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यावर देणार भर
 
गेल्या 2016 च्या बॅचचे आयएएस असलेले डॉ. पांचाळ युपीएससी परीक्षेत राज्यात द्वितीय आले होते. लातूर जिल्ह्यातील उदगीरसारख्या ग्रामीण भागातील जनजीवन त्यांनी अगदी जवळून बघितले आहे. ग्रामीण भागात आरोग्यविषयक खूप समस्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रातील पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासकीय सेवेत काम करणे महत्त्वाचे 

वडील सेवानिवृत्त शिक्षक तर, आई गृहिणी आहे. डॉ. पांचाळ यांचे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले. बारावीनंतर एमबीबीएसची पदवी ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयातून मिळविली. मेडीकलची पदवी मिळविल्यावर त्यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवादेखील दिली. ग्रामीण भागातील आरोग्यविषयक समस्या सोडवायच्या असतील तर, प्रशासकीय सेवेत काम करणे महत्त्वाचे आहे, हा विचार त्यांच्या मनात आला. 2013मध्ये पहिल्यांदा युपीएससीची परीक्षा दिली. त्यात अपयश आले. 

प्रशासकीय कामकाज जवळून बघितले.

2014 मध्ये परीक्षेत मुलाखतीपर्यंत पोहोचता आले. 2016 मध्ये थेट राज्यातून द्वितीय  आले. 2004 ते 2007 या कालावधीत जिल्हा परिषदेत सीईओ राहिलेले श्रीकर परदेशी स्वत: डॉक्टर होते. त्यांनतर पांचाळदेखील एमबीबीएस पदवीधर आहेत. दोघांतील हा समान दुवा आहे. युपीएससीचा अभ्यास करताना डॉ. परदेशी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. त्यांचे प्रशासकीय कामकाज जवळून बघितले. त्यांच्याकडून आयएएस होण्याची प्रेरणा मिळाली, असे डॉ. पांचाळ यांनी सांगितले. 

‘कोविड’ युद्धासाठी अ‍ॅक्शन प्लॅन

सध्या आपण सर्वच जण कोरोना संकट काळातून जात आहोत. शहरी भागापर्यंत मर्यादीत असलेला कोरोनाने आता मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिरकाव केला आहे. या लढाईसाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केल्याची माहिती सीईओ पांचाळ यांनी दिली. साधा ताप, सर्दी, खोकला झाला तरी, ग्रामीण भागात औषधविक्रेत्यांकडून गोळी घेतली जाते. हा प्रकार धोकादायक आहे. डॉक्टरच्या सल्ल्यानेच औषधी घेतली पाहिजे. ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येईल. कोरोनाचा धोका वृद्घ, लहान मुलेच नाहीत तर, तरुणांनाही आहे. रॅपीड अँन्टिजन टेस्ट जास्तीत जास्त करण्यात येईल. कॉन्टॅक्ट ट्रेसींसवर अधिक भर देण्यात येईल. नागरिक माहिती लपविण्याचा प्रयत्न करतात. संपर्कातील कुणीही सुटणार नाही, यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगू नये
आपल्याला इंग्रजी भाषा येत नाही, म्हणून भीती बाळगणे चुकीचे आहे. इंग्रजी, मराठी, इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व असले पाहिजे. माझेही प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच झाले आहे. सुरुवातीला काही प्रमाणात त्रास झाला. मात्र, युपीएससीचा अभ्यास करताना कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असताना कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगू नये. 
-डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ (आयएएस)
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, यवतमाळ.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com