वाह रे कोरोना! आता सर्वसामान्यांचे खाण्याचेही वांदे.. भाजीपाल्याच्या दरवाढीने गृहिणींचे बिघडले बजेट...

price of vegetables are getting high due to lockdown
price of vegetables are getting high due to lockdown

अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) ः कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या  22 मार्चपासून लॉकडाउन आहे. त्यामुळे अनेकांच्या हाताला कामे नाहीत. रोजगार गेल्याने अनेकांजवळ पैसा उरला नाही. दोनवेळच्या अन्नाचा पेच आहे. असे असतानाच भाजीपाल्याची दरवाढ सर्वसामान्यांकरिता चिंतेचा विषय ठरली आहे. त्यामुळे अनेकांवर अर्धपोटी राहण्याची वेळ आली आहे. 

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री 

विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर हे जिल्हे प्रामुख्याने धान उत्पादक जिल्हे म्हणून प्रसिद्ध आहेत. या जिल्ह्यांत प्रमुख आहार म्हणून भात व भाजी यांचा समावेश असतो. तसेही हे जिल्हे खेड्यांमध्ये वसले आहेत. विशेष म्हणजे, गोंदिया जिल्ह्यात खरीप पिकाबरोबरच रब्बी हंगामातसुद्धा धानपीक घेतले जाते. त्यामुळे सगळ्यांच्याकडे जेवणातील प्रमुख घटक भात उपलब्ध असतो. भातासोबतच भाजीसुद्धा आवश्‍यक असते. मात्र, सध्याच्या स्थितीत भाजीपाला महागला आहे. या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. 

चार पट वाढले भाव 

सामान्यतः भाजीपाला हा प्रतिकिलो पंधरा ते वीस रुपये दराचा असतो. मात्र गेल्या एक ते दीड महिन्यांपासून सर्वच भाजीपाला 60 ते 80 रुपये प्रतिकिलो दराने मिळत असल्याने काय खावे आणि काय खाऊ नये, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सरकारने उपाययोजना करून वाढलेल्या भाजीपाल्याचे दर कमी करावे, अशी मागणी होत आहे. 

राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मदतीला धावेनात! 

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर पहिल्या दोन-तीन आठवड्यात राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि सरकारनेही जेवणाची सोय केली होती. मात्र, आता साऱ्यांनीच हात वर केले आहेत. दरम्यान, ऐनवेळी भाजीपाल्याचे दर एकदम वाढल्याने आणि हातात पैसे नसल्याने मजूर लोकांसमोर सकाळ-संध्याकाळचा जेवणाचा प्रश्‍न आहे. उल्लेखनीय म्हणजे, स्वस्त धान्य दुकानातून रेशनही मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. 


स्वयंपाकाचे बजेट बिघडले 
भाजीपाल्याचे दर काही दिवसांपूर्वी प्रतिकिलो 15 ते 20 रुपये होते. मात्र गेल्या एक ते दीड महिन्यांपासून हे दर प्रतिकिलो 60 ते 80 रुपये झाले आहे. त्यामुळे स्वयंपाकाचे बजेट पूर्णतः बिघडले आहे. 
- भूमिका गोंडाणे
गृहिणी, इसापूर.  

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com