परवानगीपेक्षा अधिक वाळूचा उपसा, ठेकेदाराला लाखाेंचा दंड

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

वाळूचा उपसा करून त्याचे वहन केल्याप्रकरणी देवरी तालुक्‍यातील रहिवासी ठेकेदार अनिल बिसेन यांच्यावर तहसीलदारांनी 14 लाख 1 हजार 300 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

आमगाव (जि. गोंदिया) : वाळूचे अवैध उत्खनन हा नित्याचा गुन्हा झाला आहे. या अवैध धंद्यात अनेक माफीये अडकले आहेत. परिणामी कितीतरी गुन्हे घडत असतात परवानगीपेक्षा अधिक  वाळूचा उपसा करून त्याचे वहन केल्याप्रकरणी देवरी तालुक्‍यातील रहिवासी ठेकेदार अनिल बिसेन यांच्यावर तहसीलदारांनी 14 लाख 1 हजार 300 रुपयांचा दंड ठोठावला आहे. महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 च्या कलम 48(7)अंतर्गत 1038 ब्रास गौण खनिज उत्खनन केल्याने 30 दिवसांच्या आत ही दंडाची रक्कम शासनात जमा करण्यास सांगण्यात आले आहे. दंडाची रक्कम मुदतीच्या आत न भरल्यास अनिल बिसेन हे कारवाईस पात्र राहणार असल्याचे आपल्या आदेशात तहसीलदार डी. एस. भोयर यांनी म्हटले आहे.
बिसेन यांनी लिलावात खरेदी केलेला वाळूसाठा 100 ब्रास एवढा असताना चौकशीदरम्यान मात्र, 1038 ब्रासचे उत्खनन झाल्याचे समोर आले. ज्यांच्या शेतामध्ये हा वाळू साठा आहे, त्या शेतकऱ्यांना 19 मे रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
दरम्यान, आमगाव तालुक्‍यातील वळद येथे आपल्या शेतात फळझाडे लावण्याकरिता सरपंच किशोर रहांगडाले यांच्या नर्सरीत गेलो असता त्यांनी आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रात जप्त करण्यात आलेल्या वाळूसाठ्याचा लिलाव आहे. आपणास वाळू खरेदी करावयाची असेल तर 13 मे रोजी दुपारी लिलावाकरिता अधिकची बोली लावून विकत घ्या असे सांगितले. त्यामुळे मी 5 हजार रुपयांची अनामत रक्कम भरून लिलावात सहभाग घेतला. या लिलावात आपल्या व्यतिरिक्त इतर 3 जणांनी सहभाग घेतला होता.आपली बोलीची रक्कम सर्वाधिक असल्याने लिलाव मला मिळाले आणि लिलावाची रक्कम 1 लाख 46 हजार 360 रुपये चालानच्या माध्यमातून बँकेत जमा करून वाहतूक परवाना घेतला. वाहतूक साठ्याच्या परवान्याप्रमाणे 15 ते 22 मे पर्यंत दोन ट्रॅक्‍टर व एका टिप्परद्वारे वाहतूक करावयाची होते, त्यानुसारच आपण वाळूची वाहतूक करीत होतो.

सविस्तर वाचा - कर्जमाफी झाली, आता पीककर्ज देण्यास बँकेची ना, काय आहे कारण...

इतर कुठल्याही वाळूचा उपसा न करताच लिलावाच्या वाळूचीच वाहतूक करीत असल्याचे चौकशी दरम्यान ठेकेदार बिसेन यांनी बयाणात सांगितले. मात्र, तक्रारीच्या आधारावर वळद येथील मौका चौकशी करण्यात आली असता सदर जागेतून 1038 ब्रास वाळूचे अवैध उत्खनन करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने बिसेन यांच्यावर 14 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Penalty of Rs.14 lacs for sand smuggling