आता व्हायरलचा 'ताप' सोसवेना; अमरावती जिल्ह्यात डेंगी, मलेरियाचा प्रकोप

सुधीर भारती 
Saturday, 5 September 2020

सध्या कोरोनाचा फैलाव सर्वत्र अधिक वेगाने होत आहे. मागील काही दिवसांचा विचार करता ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अधिक वेगाने वाढली आहे.

अमरावती : एकीकडे कोरोनाशी लढा देताना सर्वसामांन्यांच्या तोंडचे पाणी पळत आहे तर दुसरीकडे आता डेंगी, मलेरिया व इतर आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. ग्रामीण भागातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये तापाने फणफणणारे अनेक रुग्ण येत असून शहरातसुद्धा अशीच स्थिती आहे. त्यामुळे आरोग्ययंत्रणेवरील ताण अधिकच वाढला आहे.

अधिक माहितीसाठी - भावी लष्करी अधिकार्यांच्या सुविधेसाठी लालपरी सज्ज, तब्बल एवढ्या फेर्या

सध्या कोरोनाचा फैलाव सर्वत्र अधिक वेगाने होत आहे. मागील काही दिवसांचा विचार करता ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अधिक वेगाने वाढली आहे. आरोग्ययंत्रणेवर चांगलाच ताण येत असतानाच आता वातावरण बदल तसेच घाणीच्या साम्राज्यामुळे डेंगी, मलेरियाच्या रुग्णांची भर पडली आहे. दरदिवशी खोकला, ताप, सर्दी, घशातील खवखव असा त्रास असणारे रुग्ण वाढत चालले आहेत. 

विशेष म्हणजे ताप, सर्दी खोकल्याची लक्षणे असल्यास कोविडचा संशय व्यक्त करण्यात येत असल्याने नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत. अनेकांना तपासण्या कराव्या लागत आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्यकेंद्र, उपजिल्हा रुग्णालये तसेच खासगी दवाखाने रुग्णांनी "हाउसफुल्ल' झाली आहेत. शहरी भागातसुद्धा कचऱ्याचे ढिगारे जागोजागी, गल्लोगल्ली साचलेले आढळून येतात. अशा स्थितीत नागरिकांवर दुहेरी संकट कोसळले आहे.

हेही वाचा - काय सांगता! जर्मनीने युद्धात शस्त्र म्हणून केला होता डासांचा वापर; जाणून घ्या डासांबद्दलच्या माहिती नसलेल्या गोष्टी

अस्वच्छता कायम रहें

ग्रामीण भागाचा विचार करता बहुतांशी गावांमध्ये शेणाचे ढिगारे तसेच कायम आहेत. आरोग्य विभागाकडून ग्रामपंचायतींना नोटीस देण्यात आलेल्या आहेत, मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही. अस्वच्छता कायमच आहे. तुंबलेल्या नाल्या, कचऱ्याचे ढिगारे, साचलेली डबकी यामुळे मलेरिया व तत्सम आजारांचा फैलाव होताना दिसतो. शहरी भागातसुद्धा स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची ओरड आहे.

सध्या डेंगीचे रुग्ण केवळ मोर्शी ब्लॉकमध्ये आढळून आले आहेत, इतरत्र नाही. बदलत्या वातावरणामुळे व्हायरलच्या रुग्णांत निश्‍चितच वाढ झाली आहे. आरोग्यकेंद्र स्तरावर ओपीडी सुरू असून रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
-डॉ. मनीषा सूर्यवंशी,
जिल्हा साथरोग अधिकारी.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people are ill due to viral fever in amravati