
जागतिक आदिवासीदिनाच्या पूर्वसंध्येला लाहेरी उप पोलिस स्टेशन, केंद्रीय राखीव पोलिस दल 37 बटालियन व लाहेरी येथील ग्रामस्थांनी सामूहिक खर्चाने भामरागड ते लाहेरी अशी तार जोडणी करून अतिदुर्गम अशा आदिवासीबहुल परंतु नक्षल प्रभावित लाहेरी येथे वायफाय सुरू केले.
भामरागड (जि. गडचिरोली) : तालुक्यातील अतिदुर्गम अशा लाहेरी आणि परिसरातील गावांत राहणाऱ्या नागरिकांना इंटरनेटची सोय नसल्याने जगापासून तुटून राहावे लागत होते. पण, आता येथील ग्रामस्थांनी एकत्र येत लाहेरी पोलिस स्टेशन आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या मदतीने वायफाय सुरू केल्यामुळे येथील कनेक्टिव्हिटीची समस्या अखेर सुटली आहे.
जागतिक आदिवासीदिनाच्या पूर्वसंध्येला लाहेरी उप पोलिस स्टेशन, केंद्रीय राखीव पोलिस दल 37 बटालियन व लाहेरी येथील ग्रामस्थांनी सामूहिक खर्चाने भामरागड ते लाहेरी अशी तार जोडणी करून अतिदुर्गम अशा आदिवासीबहुल परंतु नक्षल प्रभावित लाहेरी येथे वायफाय सुरू केले. पुढे अशी जोडणी मल्लमपोडूर येथेही करण्यात आली. त्यानंतर होडरी येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमवली असून लवकरच तेही घरबसल्या जगाशी जोडले जातील.
येथेच न थांबता उप पोलिस स्टेशन लाहेरीचे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर यांनी पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक सोमय मुंढे, उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात व तहसीलदार अनमोल कांबळे यांच्या सहकार्याने परिसरातील नागरिकांसाठी पोलिस स्टेशनमध्ये आधार कार्ड शिबिराचे आयोजन केले. त्याचा परिसरातील नागरिकांना मोठा लाभ झाला.
पुढे भामरागड तहसीलदार अनमोल कांबळे व बीएलओ यांच्या मदतीने घरोघरी भेट देऊन त्यांनी नवीन पात्र मतदारांचा शोध घेऊन त्यांना पोलिस स्टेशनला झेरॉक्स व पासपोर्ट साइजच्या फोटोची मोफत सेवा पुरवून तब्बल 192 अर्जांची नोंदणी केली. संबंधित बीएलओकडे हे अर्ज सुपूर्द केले. आता आणखी एक पाऊल पुढे जात आधार कार्ड आधारे ऑनलाइन पद्धतीने पॅन कार्ड काढण्याबाबत मार्गदर्शन व नोंदणी अभियान 23 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत उप पोलिस स्टेशनला राबवीत सामाजिक बांधिलकी जपली. लाहेरी पोलिस स्टेशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून समस्या दूर केल्याबद्दल लाहेरी व परिसरातील नागरिकांनी प्रभारी अधिकारी नळेगावकर यांचे आभार मानले आहेत.
शासन आपल्या दारी...
प्रभारी अधिकारी नळेगावकर यांनी राबविलेल्या या अभिनव उपक्रमामुळे परिसरातील गरीब व अशिक्षित नागरिकांना शासकीय दस्तऐवज सहजरित्या उपलब्ध झाले आहेत. प्रभारी अधिकारी नळेगावकर यांनी राबविलेले हे उपक्रम स्तुत्य व अनुकरणीय असून याचे अनुकरण इतर ठिकाणीही झाल्यास खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी ही संकल्पना सार्थ होऊ शकते, असे मत व्यक्त होत आहे.
संपादन - अथर्व महांकाळ