ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

सूरज पाटील
Thursday, 12 November 2020

कोरोनाची कोणतीही धास्ती नागरिकांच्या मनात राहिली नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिक बिनधास्त घराबाहेर फिरत असल्याने दिवाळीनंतर कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती त्यामुळे व्यक्त होत आहे.

यवतमाळ : कर्मचाऱ्यांच्या हातात पगार पडताच दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. बाजारपेठेत गर्दी उसळत आहे. नागरिक कोरोनाच्या नियमांचे पालन न करताच घराबाहेर पडत आहेत. मास्क वापरला जात नाही, सोशल डिस्टन्सिंग ठेवले जात नाही. सॅनिटायझरचा वापर तर करतच नाही, असे बाजारपेठेतील चित्र आहे.

हेही वाचा - महाविकास आघाडीत बिघाडी; काँग्रेसने उमेदवार दिल्यावरही...

दिवाळी हा प्रकाशपर्वाचा सण. हा सण अतिशय उत्साहात व आनंदात साजरा केला जातो. कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दिवाळी सणातच शेतकऱ्यांच्या हातात पैसा येत असल्याने त्यांच्या भरवशावरच आर्थिक उलाढाल होत असल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. मात्र, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. लागवडीचा खर्च निघाला नाही. खासगी सावकार पैशांच्या परतफेडीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावत आहे. हातात पैसा नाही, उत्पन्न घरात आले नाही, सण साजरा करावा की, पुन्हा उसनवारी करून कर्ज परतफेड करावी, या विवंचनेत जिल्ह्यातील शेतकरी आहेत. कर्मचाऱ्यांचे पगार झाल्याने त्यांची दिवाळी उत्साहात होणार आहे. त्यासाठी विविध वस्तूंची खरेदी केली जात आहे. बाजारात महिला, पुरुष, तरुण, तरुणी, मुले सर्वच येत आहेत. कोरोनाची कोणतीही धास्ती नागरिकांच्या मनात राहिली नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिक बिनधास्त घराबाहेर फिरत असल्याने दिवाळीनंतर कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती त्यामुळे व्यक्त होत आहे.

हेही वाचा - हॉटेल, लॉज मालकांनो रेकॉर्ड अपडेट ठेवा; अन्यथा होणार...

वाहतुकीची कोंडी -
नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. दुचाकी व चारचाकी वाहनांना कुठेही उभे करून नागरिक खरेदीसाठी दुकानात जातात. बेशिस्तीमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतुकीसह कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people crowd in market for diwali shopping at yavatmal