हॉटेल, लॉज मालकांनो रेकॉर्ड अपडेट ठेवा; अन्यथा होणार कारवाई

संतोष ताकपिरे
Thursday, 12 November 2020

स्थानिक प्राधिकरणाने दिलेल्या क्षमतेपेक्षा अधिक जास्त क्षमतेने ग्राहक दिसल्यास कारवाई केली जाईल. प्रत्येक ठिकाणी स्वच्छता, सुरक्षिततेच्या दृष्टीने सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक राहील.

अमरावती : शहरातील हॉटेल, लॉजसह बार आणि सिनेमागृहातील रेकॉर्ड अपडेट ठेवा. ग्राहकांच्या वाहनाच्या पार्किंगसह त्याच्या सुरक्षेची जबाबदारी मालकाची आहे. त्यासाठी आवश्‍यक उपाययोजना कराव्यात; अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी दिला.

हेही वाचा - अमेरिकेतील मराठमोळे आमदार ठाणेदार यांनी नागपूरला दिली होती भेट, सुरेश भट सभागृहात गाजलेला डायलॉग...

आयुक्तालयाच्या सभागृहामध्ये शहरातील बार, हॉटेल, लॉजसह सिनेमागृह संचालक, मालकांची बुधवारी (ता. 11) बैठक झाली. त्या बैठकीला पोलिस आयुक्तांसह उपायुक्त यशवंत सोळंके, शशिकांत सातव आदींची उपस्थिती होती. नमूद ठिकाणी अस्तित्वात असलेल्या क्षमतेपेक्षा ५० टक्केच ग्राहकांना प्रवेश द्यावा लागेल. स्थानिक प्राधिकरणाने दिलेल्या क्षमतेपेक्षा अधिक जास्त क्षमतेने ग्राहक दिसल्यास कारवाई केली जाईल. प्रत्येक ठिकाणी स्वच्छता, सुरक्षिततेच्या दृष्टीने सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक राहील.

हेही वाचा - अरे हे काय, पाहुण्या पक्ष्यांच्या आगमनाला यंदा होणार...

लॉज, हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांचे आधारकार्ड, मोबाईल नंबर, पत्ता अशा दैनंदिन नोंदी ठेवणे बंधनकारक राहील. याव्यतिरिक्त परदेशी नागरिकांचे संबंधित सी व एस फॉर्म भरले जावे. ज्या खाद्यगृहास परमीट रूमची परवानगी नाही, अशा ठिकाणी मद्यविक्री अथवा मद्यप्राशन करताना कुणी आढळल्यास संबंधित यंत्रणेकडून कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही पोलिस आयुक्तांनी म्हटले. यावेळी शहरातील 30 संबंधित सिनेमागृहे, हॉटेल, लॉज, बार मालक व्यवस्थापनेचे सदस्य उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: action against hotel and lodge if not update record in amravati