मार्चमध्येच पाणीटंचाईचे संकट, विहिरींनी गाठला तळ; एप्रिल अन् मे महिन्यात काय होणार?

people faced water scarcity issue in samudrapur of wardha
people faced water scarcity issue in samudrapur of wardha

समुद्रपूर (जि. वर्धा) : पावसाळ्यात नगण्य झालेला पाऊस, अद्याप सुरू न झालेली नवीन पाणीपुरवठा योजना, पुरातन पाणीपुरवठा योजनेवरचे अवलंबित्व व ऐन  फेब्रुवारी महिन्यातच विहिरींनी गाठलेला तळ यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचे सावट समुद्रपूर शहरावर गडद झाले आहे.  

यंदा मार्च महिन्याच्या प्रारंभीच उन्हाचे तडाखे बसणे सुरू झाले आहे. नगरपंचायतीची पाणीपुरवठ्याची मदार 30 वर्षे जुन्या पाणीपुरवठा योजनेवरच अवंलबून आहे. तीस वर्षांच्या कालावधीत शहराची लोकसंख्या दहापटीने वाढली, पण पाणीपुरवठ्याची सोय तीच आहे. कधी दोन दिवसांआड तर कधी चार दिवसांआड नागरिकांना पाणी दिले जाते. कधी-कधी तर आठ -आठ  दिवस नळाला पाण्याचा थेंबही येत नाही. नवीन 13 कोटींची पाणीपुरवठा योजना अर्धवट अवस्थेत आहे. वॉर्ड क्रमांक 13, 14 व 15 मध्ये नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचे नळसुद्धा नाही. त्यामुळे येथील जनतेला घरगुती विहीर व बोअरवेलच्याच पाण्याचा आधार आहे. पण मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच विहिरींनी तळ गाठला असून या महिन्याच्या अखेरीस विहिरींना कोरड पडण्याची शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन परिस्थिती चिघळू शकते. नगरपंचायत प्रशासनाने वेळीच नियोजन करून परिस्थिती हाताळावी लागणार आहे.

नगरपंचायतीसमोर टँकरचाच पर्याय -
नवीन पाणीपुरवठा योजना अद्याप कार्यान्वित न झाल्यामुळे व जुनी पाणीपुरवठा योजना अपुरी आहे. परिणामी, नगरपंचायतींसमोर नागरिकांना टँकरनेच पाणीपुरवठा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

नगरपंचायतीचा 'भार'  प्रभारीवरच -
नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी दीर्घ सुट्यांवर आहे. सध्या नगरपंचायतीचा  प्रभार हिंगणघाट नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिल जगताप यांच्याकडेच आहे. दोन-दोन ठिकाणी काम करताना त्यांची तारांबळ होत असून पाण्याचा प्रश्न ते सोडवतील की समुद्रपूरच्या जनतेला वाऱ्यावर सोडतील, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

पावसाळ्यात अल्प पाऊस -
मागील वर्षी 1096 मीमी पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे पाण्याची झळ समुद्रपूरवासियांना पोहोचली नाही. मात्र, यावर्षी 638 मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे. एवढा अल्प पाऊस मागील दहा वर्षांत झाला नाही. त्यामुळे कोरड्या दुष्काळाची धग पाणीटंचाईच्या रूपात येणार आहे. मार्च महिन्यातच विहिरींनी तळ गाठला आहे. अजून उन्हाळ्याचे तीन महिने आहेत. नगरपंचायतीने नवीन पाणीपुरवठा  योजना अद्याप सुरू  केली नाही. टँकरने पाणीपुरवठा झाला तरी तो अपुराच असतो.
-ताराचंद रणदिवे, वॉर्ड क्रमांक 13

घरच्या विहिरींनी तळ गाठला आहे. आमच्याकडे नगरपंचायतीच्या नळ योजनेची जलवाहिनी 30 वर्षांपासून पोहोचली नाही. परिसरात एकही सार्वजनिक विहीर, बोअरवेल नाही. पाण्यासाठी आम्ही आता कुठे भटकंती करावी.
-कुणाल खिळेकर, समुद्रपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com