ज्या शहरानं निर्माण केले अनेक दिग्गज त्या चांदूरबाजारची इज्जत कुणी राखेल का? समस्यांचा महासागर 

झपाट्याने होत असलेल्या अनियंत्रित शहरीकरणामुळे लोक त्रस्त झाले आहेत. ‘शहर मशहूर; परंतु चेहरा बेनूर’ अशीच काहीशी स्थिती आहे. सरकारी यंत्रणेवर नियंत्रण घालत या शहराची इज्जत कुणी राखेल का? हाच प्रश्न उपस्थित होतोय. 
झपाट्याने होत असलेल्या अनियंत्रित शहरीकरणामुळे लोक त्रस्त झाले आहेत. ‘शहर मशहूर; परंतु चेहरा बेनूर’ अशीच काहीशी स्थिती आहे. सरकारी यंत्रणेवर नियंत्रण घालत या शहराची इज्जत कुणी राखेल का? हाच प्रश्न उपस्थित होतोय. 

चांदूरबाजार (अमरावती) : जिल्हाभर वर्चस्व निर्माण करणारे नेते चांदूरबाजार तालुक्याने दिले. माजी पालकमंत्री वसुधाताई देशमुख, विद्यमान शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखाताई ठाकरे, माजी पालकमंत्री दिवंगत विनायकराव कोरडे हे या तालुक्याची शान मानले जातात. लोक अभिमानाने यांची नावे घेतात. गुळाची मोठी बाजारपेठ आणि महिनाभर चालणाऱ्या बहिरम यात्रेसाठी हा तालुका प्रसिद्ध आहे. या तालुक्याने दिग्गज निर्माण केले आणि शहर प्रसिद्ध असले म्हणून काय झाले? शहराची दशा काही बदलली नाही. झपाट्याने होत असलेल्या अनियंत्रित शहरीकरणामुळे लोक त्रस्त झाले आहेत. ‘शहर मशहूर; परंतु चेहरा बेनूर’ अशीच काहीशी स्थिती आहे. सरकारी यंत्रणेवर नियंत्रण घालत या शहराची इज्जत कुणी राखेल का? हाच प्रश्न उपस्थित होतोय. 

परतवाडा आणि अचलपूर या जुळ्या शहरांतील मुक्कामानंतर चांदूरबाजारकडे निघालो. शहरापर्यंतचा प्रवास सुखकर झाला. परंतु शहरात एन्ट्री होताच खड्डेभरले रस्ते लागले. साई मंदिराजवळ वाहनांची लांबच लांब रांग दिसली. अर्धा किलोमीटर अंतर पार करताना अक्षरशः कंटाळा आला. बसस्थानकावर पोहचताच ‘सकाळ’चे तालुका बातमीदार शरद केदार यांनी हसत-हसत स्वागत केले. त्यांनी शिरजगाव बंडचे बातमीदार वैभव उमक व शिरजगाव कसबाचे बातमीदार ओमप्रकाश कुऱ्हाड यांचीही ओळख करून दिली. मिनिटात त्यांच्यासोबत दोस्ती झाली आणि मग आम्ही चार यार निघालो जयस्तंभ चौकाकडे.

आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी पिण्यास शुद्ध पाणी, रस्ते व सांडपाण्यासाठी नाल्या असणे गरजेचे आहे. ही जबाबदारी संबंधित प्रशासनाची आहे. वाढते औद्योगिकीकरण, बदलती गावे यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ले-आउट पडणे सुरू आहे. चांदूरबाजार येथेही हेच चित्र दिसले. परंतु निव्वळ ले-आउट पाडून संबंधितांची जबाबदारी संपत नाही. ‘दिवसभर कमी प्रमाणात असलेली दुर्गंधी रात्री उग्र रूप धारण करते. ज्यामुळे झोपेचे खोबरे होते. डासांचा त्रास तर विचारूच नका. खाली प्लॉटमध्ये साचलेल्या पाण्यामुळे जलप्रवाह दूषित होत आहेत. काहीतरी बंदोबस्त करा ना भौ...’ गुळाचे व्यापारी श्री. बोरेकर यांची ही प्रतिक्रिया. ही समस्या किती मोठी आहे, हे लक्षात आले. त्यांच्या दुकानात घाटाच्या गुळाची चव घेतली. त्यांच्या गुळाची चव जरी गोड असली तरी त्यांनी मांडलेल्या समस्या प्रचंड कडवट होत्या. त्या पचवत पुढे निघालो.

भाजपचे तालुकाध्यक्ष मुरली माकोडे यांची चौकात भेट झाली. त्यावेळी रस्त्यांचा विषय निघाला. ते म्हणाले, या रस्त्याला महामार्ग म्हणून मंजुरी मिळाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजू कित्येक दिवसांपासून पूर्ण झालेल्या आहेत; मात्र अद्याप या रस्त्याचे काम सुरू झाले नसल्याने यात राजकीय हस्तक्षेप तर करण्यात आला नाही ना?, अशी शंका वाटते. किसान चौकातून जात असताना किसान पुतळ्याजवळील संजू शिरभाते यांच्या जय श्रीराम हॉटेलमधील गरमागरम आलुबोंड्यांवर ताव मारला. मग शरदरावांनी दिलेला गूळही तोंडात टाकला. सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा मोठाच प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. मग शहरालगतच्या परिसरात भेट देण्याचे ठरले. टोंपे महाविद्यालयाच्या मागील बाजूच्या गोकुलधाम कॉलनीत प्रवेश केला. आत शिरताच समस्यांची रांग लागलेली दिसली. या कॉलनीला वीस वर्षे पूर्ण होत असून, सोयी-सुविधा अद्याप नसल्याचे शिवाजीराव वाकोडे यांनी सांगितले. ग्रामपंचायत आमच्यावर कर आकारते; मात्र सुविधा देत नाही, अशी खंत यावेळी शरद धोटे यांनी व्यक्त केली.

खाली प्लॉट झाले डबके

गोकुलधाम, कोंडे ले-आउट, अमरावती-बोराळा मार्गावरील भक्तिधामसमोरील काही कॉलनीत तसेच शहरालगत असलेल्या काही कॉलनींमध्ये हीच परिस्थिती दिसून आली. त्यात सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या या भागात बांधलेल्या नाहीत. विशेषतः जुन्या ले-आउटमध्ये मोठी घरे दिसत असून, सांडपाणी रस्त्या रस्त्यावरून वाहताना दिसून येते. सांडपाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसल्याने आजूबाजूच्या खाली प्लॉटमध्ये ते सोडले जाते. त्यामुळे अशा कॉलनीत आज ठिकठिकाणी डबके साचलेले आहे.

मैदान झाले सांडपाण्यामुळे विद्रुप

या साचलेल्या पाण्यात डुकरांचे कळप दिसतात. काही कॉलनी आणि ले-आउटमध्ये खुल्या सोडलेल्या मैदानाच्या जागेत घरातील सांडपाण्याचे पाईप सोडलेले आहेत. सांडपाण्यामुळे डासांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दुर्गंधीमुळे नाकावर रूमाल ठेवूनच परिसरात वावरावे लागते. हा परिसर रोगांना आमंत्रण देत आहे. पावसाळ्यात पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणे कठीण होते. साथरोग बळावतात. नाल्या तसेच अन्य बांधकामासाठी ग्रामपंचायत निधी पुरवू शकत नाही. यामुळे अशा कॉलनीत नाल्या बांधल्या जात नसल्याचे वास्तव आहे.

परवानगी उठली जीवावर

ले-आउटधारकांना मंजुरी देताना संबंधित ले-आउटधारकांनी आपल्या ले-आउटमध्ये कोणकोणत्या नागरी सुविधा पुरवण्यात आल्या, याबाबत पडताळणी करूनच परवानगी दिली जाते. मात्र, शहरालगतच्या काही जुन्या ले-आउटमध्ये अधिकाऱ्यांनी डोळे लावून परवानगी दिली की काय? हेच येथे न पुरविण्यात आलेल्या सुविधांवरून दिसून येते. ले-आउट पाडताना संबंधित अधिकाऱ्यांनी परवानगी देताना कोणत्याही नागरी सुविधा पडताळून न पाहता परवानगी दिली. आज त्याच परवानग्या नागरिकांच्या जीवावर उठल्या आहेत.

कर घेतात, पण सुविधा नाही

कोणतेही ले-आउट पाडताना, त्या ले-आउटधारकाला आवश्‍यक त्या सुविधा व कागदपत्रे सादर करण्याचे बंधन असावे. अधिकाऱ्यांनी आवश्‍यक असलेल्या कागदपत्रांची पडताळणी करावी. ले-आउटधारकाने त्या ले-आउटमध्ये आवश्‍यक सुविधा पुरवल्या की नाही, याची चौकशी करून संबंधित ले-आउटधारकाला परवानगी देण्यात यावी. शहरालगतच्या काही कॉलनींमध्ये सुविधांचा अभाव असताना परवानगी देण्यात आली. त्याठिकाणी गोरगरिबांनी प्लॉट खरेदी करून घरे बांधली. त्यावर संबंधित ग्रामपंचायतीने करसुद्धा आकारला. मात्र तो परिसर आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे मत अनेकांनी मांडले.

अधिकारी म्हणतात

सुविधा न पुरविल्याने वाढला ताण
भूतकाळातील काही ले-आउटधारकांनी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे होते. मात्र, मूलभूत सुविधाच न पुरविल्याने त्याचा ताण ग्रामपंचायतीवर आला. त्यामुळे आम्ही आता नवीन ले-आउटधारकांनी नोंद घेताना नगररचना विभागाच्या नियमानुसार त्या सुविधा ले-आउटधारकांनी पुरवल्या की नाही, याबाबत चौकशी केल्यानंतरच ग्रामपंचायतीच्या आठ-अ ला नोंद घ्यावी, असे परिपत्र निर्गमित केले आहे.
- डॉ. प्रफुल्ल भोरखडे, 
गटविकास अधिकारी, चांदूरबाजार

मूलभूत सुविधांची पाहणीच नाही
अधिकाऱ्यांनी अशा ले-आउटधारकांना मान्यता देताना कोणत्याही मूलभूत सुविधांची पाहणी न करता मान्यता दिली. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली. सुरुवातीला यात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी व संबंधित ले-आउटमध्ये नागरिकांना आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून द्याव्या.
-सचिन हिवराळे, 
माजी पंचायत समिती सदस्य 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com