'भाऊ, ना पाऊस, ना वारा, इथे फक्त घामाच्या धारा'; विजेच्या लपंडावाने येथील नागरिकांचे होताहेत प्रचंड हाल.. 

मिलिंद उमरे 
Monday, 3 August 2020

गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील वीजपुरवठा रात्री-बेरात्री वारंवार खंडित होत असतो. दररोज विजेच्या लपंडावाने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

गडचिरोली: सध्या पावसाळा सुरू असला, तरी यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांसोबत नागरिकही त्रस्त झाले आहेत. त्यातच महावितरण कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे विजेचा सतत लपंडाव सुरू असतो. त्यामुळे 'ना पाऊस, ना वारा, फक्त घामाच्या धारा', असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील वीजपुरवठा रात्री-बेरात्री वारंवार खंडित होत असतो. दररोज विजेच्या लपंडावाने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी लाइनमनची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, लाईनमन मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याने खंडित वीजपुरवठा वेळेवर दुरुस्त होत नाही. त्यामुळे नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागते. लाइनमन मुख्यालयीच राहत नाहीत तर तक्रार करायची कुणाकडे, असा प्रश्‍न नागरिकांतून उपस्थित होत आहे.

सविस्तर वाचा - आईने विरोध केल्याने ती झाली प्रियकरापासून दूर, त्याने लग्न करताच घर गाठत म्हणाली बायकोला हाकलून दे...

थोडा पाऊस आला तरी वीजपुरवठा खंडित

खंडित वीजपुरवठ्याने जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भाग व अतिदुर्गम भागांतील नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात विजेची समस्या नित्याचीच बाब ठरली आहे. थोडा पाऊस आला किंवा वाऱ्याचा जोर वाढला, तरी वीजपुरवठा खंडित केला जातो. अनेकदा पाऊस, वारा काहीच नसतानाही वीजपुरवठा खंडित होत आहे. दिवसा, रात्री कधीही वीजपुरवठा खंडित होतो. रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. 

डासांचा प्रचंड त्रास 

सध्या डासांची संख्या वाढली असून वीजपुरवठा खंडित होताच डासांचा त्रास सहन करावा लागतो. मात्र, या समस्येची दखल घेत नसल्याने वीजग्राहकांनी महावितरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील लाईनमन मुख्यालयी राहत नसल्याने खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करायची कुणाकडे, असा प्रश्‍न ग्रामीण भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

जिल्हाभर हवे आंदोलन

कोरची तालुक्‍यातील विजेच्या समस्येमुळे संतप्त नागरिक व लोकप्रतिनिधींनी एकत्र येत आंदोलन समिती गठित केली आहे. या सर्वपक्षीय आंदोलन समितीकडून मंगळवार (ता. 4) महावितरणविरोधात चक्‍काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. पण, ही समस्या आता केवळ कोरची तालुक्‍यापूरती मर्यादीत नसून जिल्हाभरच वाढीस लागली आहे. त्यामुळे जिल्हाभरात आंदोलन करण्याची मागणी होत आहे.

क्लिक करा - युवती ब्युटीपार्लरमध्ये चेहऱ्याच्या मसाजसाठी जायची; महिला नेहमी कशाचे तरी पाणी पिण्यासाठी देत पैशांसाठी करायची ब्लॅकमेल, वाचा...

वीज कमी, बिल अधिक

खरेतर विजेच्या सततच्या लपंडावामुळे नागरिकांना विजेचा पुरेपूर वापर करता येतो का, हाच खरा प्रश्‍न आहे. मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू झालेल्या लॉकडाउनमध्येही नागरिकांना विजेच्या समस्येचा सामना करावा लागला. मात्र, या संकटाचे संधीत रूपांतर करत महावितरणने कोरोनाचे कारण दाखवून मिटर रिडींगसाठी आपले कर्मचारी पाठवलेच नाहीत. त्यानंतर ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिल पाठविण्यात आले. यातील बहुतांश वीजबिल चारपट असल्याने नागरिकांमध्ये रोष आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people in gadchiroli frustrated due to regular load shedding