आरमोरीत चक्क नागरिकांनीच घेतली पत्रकार परिषद; पालिकेला दिला गंभीर इशारा

प्रशांत झिमटे  
Saturday, 19 September 2020

या जागेतील अतिक्रमण व अस्वच्छतेमुळे वॉर्डातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दीड वर्षांपूर्वी येथील नागरिकांनी हे अतिक्रमण काढण्याबाबत नगर परिषद प्रशासनाला निवेदन दिले.

आरमोरी (जि. गडचिरोली) : येथील शिवाजी चौकातील गजानन महाराज मंदिराच्या मागे अंदाजे 0.30 हेक्‍टर शासकीय जागा आहे. परंतु या जागेवर काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे व उर्वरित जागेत शेणखत व खड्डे असल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. नगर परिषदेने 15 दिवसांत येथील अतिक्रमण हटवून जागा स्वच्छ न केल्यास सामूहिक अतिक्रमण करण्याचा इशारा शिवाजी चौकातील नागरिकांनी शुक्रवारी (ता.18) आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

या जागेतील अतिक्रमण व अस्वच्छतेमुळे वॉर्डातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दीड वर्षांपूर्वी येथील नागरिकांनी हे अतिक्रमण काढण्याबाबत नगर परिषद प्रशासनाला निवेदन दिले. परंतु नगर परिषद प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही. येत्या 15 दिवसांत या शासकीय जागेवरील अतिक्रमण नगर परिषदेने न काढल्यास शिवाजी चौकातील नागरिक या जागेवर सामूहिक अतिक्रमण करणार, असा इशारा नागरिकांनी पत्रकार परिषदेतून दिला. 

हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे आहेत तब्बल इतके गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड; वाचून तुम्हालाही नक्की वाटेल अभिमान

नागरिकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की ,आरमोरी येथील शिवाजी चौक अत्यंत दाट लोकवस्तीचा वॉर्ड आहे. या ठिकाणी वॉर्डवासींनी भाविक भक्तांसाठी गजानन महाराज मंदिराचे 15 वर्षांपूर्वी बांधकाम केले. दरवर्षीच गजानन महाराजांचा प्रकटदिन सोहळा  या ठिकाणी मोठ्या थाटात साजरा केला जातो. या ठिकाणी सामाजिक समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यासाठी पुरेशी जागा नाही. लहान मुलांना अंगणवाडी नाही, खेळण्यासाठी मैदान नाही, त्यामुळे गजानन महाराज मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या अंदाजे 0.30 हेक्‍टर जागेवरील अतिक्रमण काढून साफसफाई केल्यास वॉर्डवासींना कोणतेही सामाजिक कार्य करण्यास सोयीचे होणार आहे. 

दीड वर्ष लोटूनही नगर परिषदेचे दुर्लक्ष 

या ठिकाणी शेणखतासाठी खड्डे असल्यामुळे रात्रंदिवस डुकरांचा हैदोस सुरू  असतो. या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली असून संपूर्ण नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या वॉर्डातील जनतेचे आरोग्य नेहमीच बिघडत असते. दुर्गंधीचा त्रास होत असल्यामुळे येथील सुज्ञ नागरिकांनी या जागेवरील अतिक्रमण काढून साफसफाई करावी, यासाठी नगर परिषद प्रशासनाला निवेदन देऊन मागणी केली होती. परंतु दीड वर्ष लोटूनही नगर परिषदेने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. नगरपरिषद प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष घालून या जागेवरील अतिक्रमण काढून ती जागा सामाजिक व सार्वजनिक कामासाठी द्यावी, अन्यथा 15 दिवसानंतर सामूहिक अतिक्रमण करणार असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. 

या पत्रकार परिषदेत शिवाजी चौकातील रहिवासी शरद भोयर, भूषण सातव, अरुण डोकरे, रूपेश वाकडे, रवी डोकरे, कवडू हूड, कांशीराम भोयर, पिंटू सातव, दिलीप सातव, अनंता मने, किशोर चिलबुले, लालाजी सपाटे, वसंत मने, मंगेश हूड , नीलकंठ नेवारे आदी नागरिक उपस्थित होते.

पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त ?

विशेष म्हणजे याच प्रभाग क्रमांक 8 मध्ये नगर परिषदेचे अध्यक्ष, बांधकाम सभापती व दोन नगरसेवक कार्यरत आहेत. तरीपण याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहेत. दीड वर्ष झाले तरी अतिक्रमणधारकांवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे अतिक्रमणधारकांवर नगर परिषद पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे की काय, अशी शंका पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली. 

क्लिक करा - सोने खरेदीकडे नागरिकांची पाठ; भाव घटले तरीही ग्राहक मिळेना; जाणून घ्या

नगर परिषद क्षेत्रातील शासकीय, आबादी सर्व जागा भूमीअभिलेख कार्यालयामार्फत मोजणी करून सीमांकन करण्याबाबत ठराव घेण्यात आला आहे. या जागेवर सीमांकन झाल्यानंतर अतिक्रमणधारकांवर कारवाई करणार आहोत. नगरपरिषदेमार्फत नियमानुसारच आम्ही कारवाई करू.
- पवन नारनवरे, अध्यक्ष,नगर परिषद,आरमोरी

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people gave warning to corporation to remove Encroachment