esakal | गावकऱ्यांनो, पुन्हा वेशीवरच रोखा कोरोना! लक्षणे दिसताच करा चाचण्या; नियमांचं करा पालन

बोलून बातमी शोधा

corona

गावकऱ्यांनो, पुन्हा वेशीवरच रोखा कोरोना! लक्षणे दिसताच करा चाचण्या; नियमांचं करा पालन

sakal_logo
By
राजकुमार भीतकर

यवतमाळ : पहिल्या लाटेत गावकऱ्यांनी गावबंदी करून कोरोनाला रोखण्यात यश मिळविले होते. दुसऱ्या लाटेत मात्र कोरोना गावागावांत शिरल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे गावात आता कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने निघत आहेत. परिणामी आरोग्य यंत्रणेवरचा ताणही वाढला आहे. तर रुग्ण गंभीर झाल्यावर रुग्णालयात पोहोचत असल्याने मृत्यूसंख्येतही रोज वाढ होत आहे.

हेही वाचा: 'तुम्हाला कार हवे की पैसे?' युवकानं दिलं उत्तर आणि घडला भयंकर प्रकार

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचा रोजचा आकडा पंचवीसच्या पुढे सरकला आहे. गेल्या आठ दिवसांत तर कोरोनाने तांडवच केले आहे. मृत्यूसंख्या 37 पर्यंत पोहोचली आहे. सर्वाधिक मृत्यू ग्रामीण भागातील असल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागात कोरोनाच्या उपचाराच्या सुविधा उपलब्ध नाहीत. तालुकास्तरावर असलेल्या कोविड सेंटरपर्यंत पोहोचण्यास रुग्णांना उशीर होतो. तोपर्यंत रुग्ण गंभीर होतो. जेव्हा रुग्ण जिल्ह्याच्या कोविड सेंटरपर्यंत पोहोचतो, त्याला ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटरची गरज भासते. आज सरकारी रुग्णालयातही बेड उपलब्ध नाहीत.

रुग्णसंख्या 'फुल्ल' झाल्याने ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर मिळेल याची शाश्‍वती राहिली नाही. खासगी रुग्णालयात बेड मिळत नाही. कोरोनाची स्थिती फारच भयानक झाली आहे. या संकटावर मात करण्यासाठी गावागावांत कोरोनाविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. लोकांनी आता एकजुटीने काम करण्याची गरज आहे. कोरोनाविषयीची माहिती प्रत्येक कुटुंबाला द्यावी लागणार आहे. गावागावांत जनता कर्फ्यूसारखे प्रयोग केले पाहिजे. संशयित रुग्णाच्या चाचणीची, विलगिकरण व उपचाराची व्यवस्था गावातच केलेली बरी. रुग्णाला लक्षणे असल्यास त्याला शहरातील कोविड सेंटरपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.

गावात आरोग्य कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी गावातील कोरोना स्थितीची माहिती तातडीने वरिष्ठांना दिली तरच आरोग्य यंत्रणा सक्रिय होईल. यासाठी गावातील सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील व गावपुढाऱ्यांनी एकत्रित येऊन आपल्या गावाला कोरोनापासून सुरक्षित कसे ठेवता यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावाने अनेकवेळी संकटाच्या काळात एकोपा दाखविला आहे. कोरोना हे राष्ट्रीय संकटच आहे. एका युद्धापेक्षा ही स्थिती वेगळी नाही. देशसेवा करण्याची यासारखी दुसरी संधी नाही. त्यामुळे गावातील तरुणांनी, समाजसेवकांनी एकत्र येऊन 'आपले गाव, आपली जबाबदारी' समजून गाव कोरोनामुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

हेही वाचा: विवाह समारंभांमध्ये कोरोनाची पंगत! सुपरस्प्रेडर वाटतात कोरोनाचा प्रसाद; नियमांची पायमल्ली

पंचसूत्रीचे पालन करा

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने पंचसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सामाजिक अंतर राखणे, लक्षणे आढळताच चाचणी करणे, पात्र नागरिकांचे लसीकरण करणे, आदी गोष्टींचे पालन करून शासनाला सहकार्य करण्याची ही वेळ आहे.

संपादन - अथर्व महांकाळ