esakal | 'तुम्हाला कार हवे की पैसे?' युवकानं दिलं उत्तर आणि घडला भयंकर प्रकार

बोलून बातमी शोधा

fraud
'तुम्हाला कार हवे की पैसे?' युवकानं दिलं उत्तर आणि घडला भयंकर प्रकार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : गिफ्ट लागल्याचे कूपन पाठवून त्यानंतर कार हवे की पैसे, अशी विचारणा करून तोतयाने चांदूरबाजार तालुक्‍यातील युवकाची 93 हजार 600 रुपयांनी फसवणूक केली. चांदूरबाजार पोलिसांनी याप्रकरणी तोतयाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

हेही वाचा: कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांना दातांची समस्या; दंतरोग तज्ज्ञांचं मत

निखिल दिलीप पडोळे (वय 30, रा. बेलोरा), असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. युवकाने पाच डिसेंबर 2020 रोजी मधुमेहाच्या आजारासाठी ऑनलाइन औषध बोलविली. त्यानंतर 12 एप्रिल 2021 रोजी त्याच युवकाला स्पीडपोस्टने एक पत्र प्राप्त झाले. डाकेने आलेल्या पाकीटमध्ये एक कूपन होते. त्यावर स्क्रॅच केले असता त्यात गिफ्ट लागल्याचे समजले. सदर युवकाने कूपनवर असलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करून काय गिफ्ट लागले याबाबत विचारणा केली असता युवकास एक कार गिफ्ट म्हणून लागल्याचे अनोळखी व्यक्तीने सांगितले.

युवकाला अनोळखी व्यक्तीने लकी नंबर विचारला असता, तो युवकाने त्याला दिला. त्यानंतर युवकाच्या वडिलांच्या मोबाईल क्रमांकावर अनोळखी व्यक्तीने पुन्हा संपर्क साधला. संपर्क करणाऱ्याने त्याचे नाव मनोज पाटिदा, असे सांगितले. त्याने युवकाच्या वडिलास गिफ्ट हे कारच्या स्वरूपात हवे की पैशांच्या स्वरूपात हवे, अशी विचारणा केली. त्यावेळी युवकाने त्यांना पैसे हवे असल्याचे सांगितले. त्यानंतर तोतयाने युवकास गिफ्टची रक्कम पाठविण्यापूर्वी कंपनीने निर्धारित केलेला कर भरावा लागेल, असे सांगितले.

हेही वाचा: ‘गेम’ होण्याच्या भीतीपोटी त्यानं केला पिंकीचा खून; हत्याकांडातील दोन्ही आरोपींना अटक

आधी ऑनलाइन 7 हजार 200 रुपये दिलेल्या खात्यावर गुगल पे द्वारे भरले. जीएसटीचे 28 हजार 800 रुपये, त्यानंतर 57 हजार 600 रुपये, असे एकूण 93 हजार 600 रुपये गुगल पे द्वारे सदर युवकाने तोतयाला पाठविले. परंतु चांदूरबाजार तालुक्‍यातील युवकास सांगितलेले गिफ्ट मिळाले नाही. आपली फसवणूक केली, असे त्याच्या निदर्शनात आले. तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

संपादन - अथर्व महांकाळ