esakal | आश्‍चर्य आहे! "त्या' गावातील नळातून येतो चहासारखा द्रव! 
sakal

बोलून बातमी शोधा

Dirty water

मागील काही दिवसांपासून येथे तपकिरी रंगाचे अतिशय गढूळ पाणी नळांमधून वाहत आहे. नागरिक तरीही भांड्यावर चाळणी ठेवून त्यावर कापडाचे अनेक थर ठेवून पाणी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

आश्‍चर्य आहे! "त्या' गावातील नळातून येतो चहासारखा द्रव! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : शहरातील धानोरा मार्गावर असलेल्या लांझेडा परिसरात मागील काही दिवसांपासून अतिशय गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्या पाण्याकडे पाहून जणू नळातून चहाचाच पुरवठा होत आहे की काय, असे वाटते. इतके गढूळ पाणी लांझेडातील नागरिकांना प्यावे लागते. जनावरेसुद्धा इतके खराब पाणी पित नाही. या पाण्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ही समस्या दूर करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. 

अवश्य वाचा- स्वतःच्या लग्नाच्या पत्रिका वाटून तो गावाकडे निघाला होता, अन...

गडचिरोली मुख्य शहरालाच लागून लांझेडा परिसर असून हा परिसर गडचिरोली नगर परिषदेच्याच हद्दीत येतो. तरीही येथे अनेक नागरी सुविधांची कमतरता आहे. नगर परिषदेने येथे नळांची व्यवस्था केली असली, तरी मागील काही दिवसांपासून येथे तपकिरी रंगाचे अतिशय गढूळ पाणी नळांमधून वाहत आहे. नागरिक तरीही भांड्यावर चाळणी ठेवून त्यावर कापडाचे अनेक थर ठेवून पाणी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, अशा प्रयत्नात कापडात मातीचा गाळ आणि चिखलाचा थर दिसून येत आहे. असे अस्वच्छ व गढूळ पाणी प्राशन केल्यास नागरिकांना अनेक आजारांना बळी पडावे लागेल. 

आरोग्य केंद्रांमध्ये वाढली रुग्णांची संख्या

सध्या कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरू असल्याने आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यात दूषित पाण्याने आजारी पडल्यास आरोग्य सुविधा मिळण्यास अनेक अडचणी येणार आहेत. म्हणून नगर परिषदेने येथील नागरिकांची समस्या जाणून घेत हा गढूळ पाण्याचा पुरवठा तत्काळ थांबवून स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.