esakal | दुर्दैवी! कुठे हमाली तर कुठे रखवाली; पोटाची खळगी भरण्यासाठी 'ते' करतात जीवाचं रान
sakal

बोलून बातमी शोधा

People leave their home to search jobs in other states

दरवर्षी जिल्ह्यातील अनेक बेरोजगार, गरीब, गरजू, मजूर, अल्पभूधारक शेतकरी रोजीरोटी कमविण्यासाठी परराज्यात जात असले, तरी यंदा हे प्रमाण विलक्षण वाढले आहे. प्रथम कोरोनाचे संकट आणि त्यानंतर निसर्गाचा मार बसल्याने शेतीत उत्पादन कमी झाले,

दुर्दैवी! कुठे हमाली तर कुठे रखवाली; पोटाची खळगी भरण्यासाठी 'ते' करतात जीवाचं रान

sakal_logo
By
अनिल ठवरे

देलनवाडी (जि. गडचिरोली) : सटवाईने भाळी लिहिलेला अठराविश्‍वे दारीद्रयाचा शाप, त्यात या अतिमागास, उद्योगविहिन जिल्ह्यात हाताला काम नाही, कोणतेही काम मिळण्याची आशा नाही. अशा गांजलेल्या परिस्थितीत जगणाऱ्या असंख्य बेरोजगारांना पोटाची खळगी भरण्यासाठी आपले गाव सोडून परराज्यात वणवण भटकावे लागते. यंदाही देलनवाडीसह जिल्ह्याच्या अनेक भागांतील बेरोजगार ग्रामस्थांचे लोंढेच्या लोंढे परराज्याच्या प्रवासाला निघाले आहेत.

दरवर्षी जिल्ह्यातील अनेक बेरोजगार, गरीब, गरजू, मजूर, अल्पभूधारक शेतकरी रोजीरोटी कमविण्यासाठी परराज्यात जात असले, तरी यंदा हे प्रमाण विलक्षण वाढले आहे. प्रथम कोरोनाचे संकट आणि त्यानंतर निसर्गाचा मार बसल्याने शेतीत उत्पादन कमी झाले, लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीअभावी येथे ना सिंचनाच्या चांगल्या सुविधा निर्माण होऊ शकल्या ना मोठा उद्योग स्थापन होऊ शकला. त्यामुळे सर्वसाधारण लोकांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. 

नक्की वाचा - जन्मदाता बापच करत होता घृणास्पद कृत्य; अखेर दिरानं उचलला विडा अन् घडला थरार

गावात हाताला काम नाही, उत्पादन कमी, धानाला हमीभाव कमी, त्यातच वाढलेली महागाई यामुळे मनावर दगड ठेवून इच्छा नसतानाही अनेक गरिबांना आपल्या कुटुंबापासून दूर होण्याची वेळ आली आहे. देलनवाडीवासी व परिसरातील अनेक गावांसह जिल्ह्याच्या कित्येक भागांतील नागरिक संसाराचे ओझे पेलण्यासाठी परराज्याची वाट धरू लागले आहेत. आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता परराज्यामध्ये महिला व पुरुषांचे जथ्थे स्थलांतरित होताना दिसत आहेत. यानिमित्ताने सामान्य लोकांची बिकट परिस्थिती सर्वांसमोर आली आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामच काय तो शेतीचा असतो. 

खरिपातील धान कापणी दिवाळीत आटोपते, त्यानंतर मळणी व इतर काम करतात करता जानेवारीपर्यंत अनेकांचे धान विकून होतात. त्यातही आधारभूत किमतीची तफावत, व्यापारी,दलालांची दगाबाजी, सरकारी नियमांचा जाच, निसर्गाच्या लहरीमुळे पिकांची हानी या सर्व संकटातून काही पैसे शेतकऱ्यांच्या हाती लागतात किंवा अनेकदा शेती आतबट्ट्याचा व्यवसाय ठरते. सिंचनाची सोय नसल्याने रब्बी हंगाम किंवा भाजीपाला लागवड फार होत नाही. 

शेतीची कामे थांबली की, मजुरांच्याही हाताला काम मिळत नाही. रोजचा संसाराचा गाडा कसा हाकायचा हा सवाल त्यांना रोज सतावू लागतो. मग, अनेकजण नजीकच्या तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड अशा राज्यांत जातात. तेथे कापूस वेचणी, भाजीपाला लागवड, मिरची तोडणी अशा कामांवर किंवा फळ पॅकेजिंग, बांधकामांवर मजूर म्हणून काम करतात. साधारणत: जिल्ह्याला तेंदूपत्त्याचे वेध लागेपर्यंत हे मजुर परराज्यात काम करतात. अनेकदा उपाशी राहून, पोटाला चिमटा देत काही पैसे गाठीला मारतात व आपल्या गावात परततात. त्यानंतर तेंदू, मोहाचा हंगाम, मग खरीप हंगाम आणि पुन्हा बेरोजगारीचे चटके बसले, की परराज्याची वाट हे आता येथील अनेकांचे जीवनचक्रच झाले आहे.

जाणून घ्या - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार

कधी सुटणार दुष्टचक्र ?

हाताला काम नसल्याने जिल्ह्यातील अनेकजण तेलंगणा, आंध्र प्रदेश किंवा मग राज्यातीलच नागपूर, मुंबई, पुणे अशा महानगरात कामे शोधायला जातात. कुणाच्या शेतात राबतात, तर कुणाच्या घराची रखवाली करतात, कुठे हमाली करतात, तर कुठे इमारत बांधकामात ओझी वाहतात. जिल्ह्यात रोजगाराच्या फारशी संधी नसल्याने त्यांना गाव सोडण्याशिवाय पर्याय उरत नाही. हे दुष्टचक्र कधी सुटणार, तरी कधी, असा प्रश्‍न हे गरीब नागरिक विचारत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ