esakal | लसीसाठी कडाक्याच्या उन्हातही होते रांगेत उभे, पण नेहमीसारखी वाटच पाहावी लागली

बोलून बातमी शोधा

कोरोना लस
लसीसाठी कडाक्याच्या उन्हातही होते रांगेत उभे, पण नेहमीसारखी वाटच पाहावी लागली
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : पहाटेपासूनच हाती बिस्कीटाची पाकिटे, पाण्याच्या बाटल्या घेऊन कडाक्‍याच्या उन्हात आपला नंबर येण्याची वाट पाहत असलेली ज्येष्ठ मंडळी निराश होऊन परतली. कोरोना लसीकरणाचा गोंधळात गोंधळ सध्या सुरू असून नागरिकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुसरा डोस असलेल्यांनाही परत जावे लागत असल्याने या मोहिमेच्या उपयुक्ततेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

लसीकरण मोहिम सुरुवातीपासून गोंधळलेली दिसून आली. लसींचा पुरेसा साठाच उपलब्ध होताना दिसत नाही. कधी 25 हजार तर कधी 13 हजार लशींचासाठा दिला जातो आणि तो अवघ्या काही तासांतच संपून जातो. मागील अनेक दिवसांपासून असाच नित्यक्रम सुरू आहे. जिल्ह्यात 135 लसीकरण केंद्रांपैकी 95 टक्के केंद्र बंद पडले आहेत. शुक्रवारी प्राप्त 13 हजार लशींचा साठा अवघ्या काही तासांतच संपला. त्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला. विशेष म्हणजे कुठल्याच लसीकरण केंद्रांवर नागरिकांसाठी मुख्यतः ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा नाहीत. पर्यायाने ज्येष्ठांना खाली जमिनीवरच आपला नंबर येण्याची वाट पहावी लागते सर्वाधिक गोची झाली आहे ती दुसरा डोस घेणाऱ्यांची, अनेकांनी पहिला डोस कोवॅक्‍सिनचा घेतलेला आहे, मात्र सद्या कोव्हिशिल्डचा पुरवठा शासन स्तरावरून केला जात असल्याने दुसरा डोस असलेल्यांना परत जावे लागत आहे. लसीकरण केंद्रावर लशी आहेत की नाहीत, कोणत्या लसी आहेत, अशा कुठल्याही सूचना दिल्या जात नाहीत. आरोग्य कर्मचारी सुद्धा उत्तरे देताना कंटाळले आहेत. किमान लसी किती उपलब्ध आहेत ते तरी सांगावे म्हणजे उन्हात रांगेत उभे राहण्याचे काम राहणार नाही, असे काही ज्येष्ठांनी सांगितले. एकूणच तुरळक लससाठा येत असून तोसुद्धा काही तासांतच संपून जात आहे. त्यामुळे प्रशासन सुद्धा हतबल झाले आहे.

शुक्रवारी 13 हजार लशींचा साठा उपलब्ध झाला असून त्याचा पुरवठा केंद्रांवर करण्यात आला आहे. लससाठा पुरेसा असल्यास ही मोहिम सुरळीत चालू शकते. शासनाकडे मागणी नोंदविण्यात आली आहे.
- विनोद करंजीकर, लसीकरण अधिकारी.

शुक्रवारी वितरित झालेला लससाठा

ब्लॉक साठा

 • मनपा व जिल्हा रुग्णालय - 3600

 • खासगी रुग्णालये - 900

 • अमरावती तालुका - 600

 • भातकुली तालुका - 600

 • चांदूररेल्वे तालुका - 600

 • धामणगाव रेल्वे तालुका - 700

 • तिवसा तालुका - 600

 • चांदूरबाजार तालुका - 700

 • नांदगाव खंडेश्‍वर तालुका - 600

 • अंजनगावसुर्जी तालुका - 600

 • दर्यापूर तालुका - 700

 • अचलपूर तालुका - 900

 • चिखलदरा तालुका - 200

 • धारणी तालुका - 300

 • मोर्शी तालुका - 600

 • वरूड तालुका - 800

 • एकूण लस - 13 हजार