निराधारांना तीन महिन्यांपासून 'आधार'च नाही, निधी अडकल्यानं उपासमारीची वेळ

कृष्णा लोखंडे
Thursday, 15 October 2020

मुलाबाळांनी सोडून दिलेल्या किंवा उत्पन्नाचे ठोस साधन नसलेल्यांना संजय गांधी निराधार योजनेचा मोठा आधार आहे. आधी या योजनेंतर्गत दरमहा सहाशे रुपये मिळत होते. त्या रकमेत वाढ करण्यात आली असून ती प्रतीमाह प्रती लाभार्थी एक हजार रुपये करण्यात आली आहे.

अमरावती : गोरगरिबांसह निराधार नागरिकांना आधार देणाऱ्या योजनेचे राज्यभरातील लाभार्थी कोरोना संक्रमणात निराधार झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून संजय गांधी, श्रावण बाळ व इंदिरा गांधी योजनांच्या लाभार्थ्यांना पैसा मिळालेला नाही. शासनाकडूनच निधी न आल्याने वितरण करता आलेले नाही, असे तहसील कार्यालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, दसरा-दिवाळीच्या तोंडावर लाभार्थ्यांच्या पदरी निराशा आली असून त्यांची फरफट होत आहे.

मुलाबाळांनी सोडून दिलेल्या किंवा उत्पन्नाचे ठोस साधन नसलेल्यांना संजय गांधी निराधार योजनेचा मोठा आधार आहे. आधी या योजनेंतर्गत दरमहा सहाशे रुपये मिळत होते. त्या रकमेत वाढ करण्यात आली असून ती प्रतीमाह प्रती लाभार्थी एक हजार रुपये करण्यात आली आहे. महापालिकेच्या क्षेत्रात या योजनेचे 9 हजार 785 लाभार्थी आहेत. त्यांना लॉकडाउनच्या काळात जुलै महिन्यापर्यंत पैसे मिळाले. त्यानंतर मात्र शासनाकडूनच निधी आला नसल्याने सलग तीन महिन्यांपासून लाभार्थ्यांच्या पदरी काहीच पडू शकलेले नाही. अमरावती महापालिका क्षेत्रातील 9 हजार 785 लाथार्भींचे 10 कोटी 77 लाख रुपये शासनाकडून अप्राप्त असल्याचे तहसीलदार प्रज्ञा मोहंदुले यांनी सांगितले.

हेही वाचा - दंत महाविद्यालयात लागला बोर्ड : रुग्णांनो, ‘आमच्याकडे ना भूल देण्याचे औषध, ना सर्जिकल ब्लेड, ना...

संजय गांधी निराधार योजनेप्रमाणेच इंदिरा गांधी व श्रावणबाळ योजनेचाही निधी रखडलेला आहे. इंदिरा गांधी योजनेचे महापालिकेच्या क्षेत्रात 2,383 लाभार्थी असून त्यांना ऑगस्टनंतर निधी मिळालेला नाही, तर श्रावणबाळ योजेनतील 9 हजार 502 लाभार्थी प्रतीक्षेत आहेत. श्रावणबाळ योजनेचे 9 कोटी 62 लाख तर इंदिरा गांधी योजनेचे 2 कोटी 38 लाख रुपये शासनाकडून अद्याप आलेले नाहीत.

तीनही योजना मिळून 19 हजार 525 लाभार्थींचे 22 कोटी 78 लाख 38 हजार रुपयांच्या निधीची प्रतीक्षा असून शासनाकडून ती दसऱ्यापूर्वी मिळाल्यास त्यांचे सणासुदीतील दिवस आनंदात जाऊ शकतील.

हेही वाचा - आईची भेट घेऊन घरी परत येत होती बारा वर्षांची मुलगी; मात्र, काळाला काही वेगळेच होते मन्य

थेट अर्ज करण्याचे आवाहन -
तीनही योजना एकाच कार्यालयातून राबविण्यात येत असून नव्या लाभार्थींनी या कार्यालयाकडे थेट अर्ज करावे. त्यासाठी कुणाही वेंडर किंवा दलालास पैसे देण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांनी पैसे जमा झाल्यानंतर ते बॅंकेतून तीन महिन्यांत काढून घ्यावेत, असे आवाहन तहसीलदार प्रज्ञा मोहंदुले यांनी केले आहे. लॉकडाउनच्या काळातही थेट आलेली प्रकरणे मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

अशी आहे सद्यस्थिती -

योजना   लाभार्थी थकित निधी
संजय गांधी निराधार योजना  9,785 10,77,7,100
इंदिरा गांधी योजना 2,383  2,38,3000
श्रावणबाळ योजना  9502 9,62,3700

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people still not received money form niradhar scheme in amravati