बारा वर्षाच्या मुलीने आईची घेतलेली भेट ठरली शेवटची; वाटेत नाल्यात पडल्याने झाला दुर्दैवी अंत

अनिल कांबळे
Thursday, 15 October 2020

आईला भेटून परत येत असताना सालेहा आणि जवेरिया पूर ओलांडत होत्या. अचानक सालेहाचे संतुलन बिघडले आणि ती नाल्यात पडली. यावेळी पाण्याचा वेग खूप होता. जवेरियाने मदतीसाठी आवाज दिला. जवळ बसलेल्या एका तरुणाने नाल्यात उडी मारली पण तोपर्यंत सालेहा खूप दूरपर्यंत वाहून गेली होती.

नागपूर : दोन वस्तींना जोडणाऱ्या नाल्यावरील पाइपने बनविलेला पूर पार करून जात असताना बारा वर्षीय मुलीचा पाय घसरला. ती नाल्यात पडून वाहून गेली. अग्निशमन दलाने शोधाशोध केल्यानंतरही मुलगी गवसली नाही. ही घटना बुधवारी घडली. या घटनेबाबत परिसरातील नागरिकांमध्ये रोष आहे. सालेहा मुस्कान सलीम अन्सारी (रा. संगमनगर) असे मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सालेहाची आई शफीकनिसा मजुरी करून घर चालवते. बुधवारी सकाळी शफीकनिसा कामावर गेली. मुलांना पैशांची गरज होती म्हणून मोठी बहीण जवेरिया फरहतसह मुस्कान आईकडून पैसे घेण्यासाठी गेली होती. वनदेवीनगरात मागील तीन वर्षांपासून पुलाचे बांधकाम सुरू आहे. या कारणास्तव दोन वस्त्यांना मोठ्या पाइपद्वारे जोडण्यासाठी तीन फूट रुंद लोखंडी पूल बांधला गेला. या वस्तीतील सर्व नागरिकांना या पुलावरून यावे लागते.

सविस्तर वाचा - मुलांनी आईला प्रश्न विचारताच सर्वच झाले शांत; काही सेकंदात आजी-आजोबांनी फोडला हंबरडा

आईला भेटून परत येत असताना सालेहा आणि जवेरिया पूर ओलांडत होत्या. अचानक सालेहाचे संतुलन बिघडले आणि ती नाल्यात पडली. यावेळी पाण्याचा वेग खूप होता. जवेरियाने मदतीसाठी आवाज दिला. जवळ बसलेल्या एका तरुणाने नाल्यात उडी मारली पण तोपर्यंत सालेहा खूप दूरपर्यंत वाहून गेली होती. स्थानिक लोकांनी नाल्यात तिचा शोध सुरू केला, पण उपयोग झाला नाही. यशोधरानगर पोलिसांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. बोटीच्या माध्यमातून नाल्यात शोध घेण्यात आला.

एकाची पावने तीन लाखांनी फसवणूक

ऑगस्ट २०२० मध्ये ४५ वर्षीय व्यक्तीची ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रिशा सिंह हिच्याशी ओळख झाली. तिने लंडन येथील फ्लीप जेओ लंडन नावाच्या कंपनीमध्ये परचेस मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. तिची कंपनी भारताच्या अहमदनगर येथील एल. एस. न्यूट्रीयंट कंपनीकडून १ लाख ७५ हजार रुपये प्रति लिटर प्रमाणे नमन्यूट्रीयंट ऑईल खरेदी करून देशात वेगवेगळे प्रॅडक्ट तयार करते. प्रिशाने पीडित व्यक्तीला ते ऑईल खरेदी करून कंपनीला ४८०० रुपये प्रति डॉलर विकून मोठ्या प्रमाणात नफा कमविण्याचे आमिष दाखविले.

क्लिक करा - अख्ख्या गावात पेटली नाही एकही चूल, कारण गावातला प्रत्येकच झाला होता शोकाकूल

आरोपींच्या जाळ्यात अडकून पीडित व्यक्तीने आर. एम. इंटरप्रायजेस कंपनीच्या खात्यात एकूण २,८५,००० रुपये जमा केले. पैसे मिळाल्यानंतरही आरोपींनी पीडित व्यक्तीला कोणताही अहवाल पाठविला नाही. त्यांनी आरोपींना विचारपूस करण्यासाठी अनेकदा फोन केला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. अखेर कंटाळून त्यांनी घटनेची पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twelve year old girl was swept in the water