शासनानं रद्द केलं आरक्षण अन् सरपंचपदाचं स्वप्न बघणाऱ्यांची झाली पंचाईत; नव्यान काढणार सोडत 

people in trouble as old reservation is cancelled for sarpanch election
people in trouble as old reservation is cancelled for sarpanch election

अमरावती ः ग्रामपंचायत निवडणुकीची धूमधाम सुरू झाली असतानाच सरपंचपदाचे जुने आरक्षण शासनाने रद्द केले आहे. ते आता निवडणुकीनंतर काढण्यात येणार असल्याने सरपंचपदी विराजमान होण्याच्या तयारीत असलेल्यांची पंचाईत झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील निवडणुका होत असलेल्या 553 ग्रामपंचायतींचे सरपंचपदासाठी काढण्यात आलेले आरक्षण नव्याने काढण्याची प्रक्रिया होणार आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्यात सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यानुसार ही पदे जातसंवर्गनिहाय निश्‍चित झाली होती. याच महिन्यात कोरोना संक्रमणाची गती वाढल्याने शासनाने निवडणुकांवर स्थगिती देत त्या पुढे ढकलल्या. निवडणुका प्रस्तावित असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. संक्रमणाची गती कमी झाल्याने स्थगित करण्यात आलेल्या निवडणुका आता घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

पुढील वर्षी जानेवारी महिन्यात 15 तारखेला या निवडणुका होत आहेत. त्यानुषंगाने सरपंचपदासाठी आरक्षणाची लगबग सुरू झाली होती. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची उद्‌घोषणा होण्यापूर्वी राज्यातील काही जिल्ह्यात सरपंचपदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली होती. तर काही जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नाही. 

आरक्षणानंतर संबंधित जातीच्या दाखल्यांची पडताळणी वेळेत न होणे, जातीचा दाखला अमान्य होणे अशी तांत्रिक कारणे उद्‌भवत असल्याने नव्याने सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे मार्च महिन्यात सरपंचपदासाठी काढण्यात आलेले आरक्षण शासनाने रद्द करण्यात आले, असे जाहीर केले आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतचे आरक्षण झाले होते तेथील इच्छुकांच्या अपेक्षेवर पाणी फेरल्या गेले आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 15 जानेवारीस मतदान होणार आहे. निवडणूक निकालीची अधिसूचना 21 जानेवारीस प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी आरक्षण सोडत तसेच सरपंच व उपसरपंच यांची निवड मतदानानंतर तीस दिवसांत काढण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील आरक्षण

जिल्ह्यात एकूण 840 ग्रामपंचायती असून त्यातील 553 ग्रामपंचायतींमध्ये 15 जानेवारी 2021 मध्ये निवडणुका होत आहेत. जातसंवर्गनिहाय आरक्षणामध्ये अनुसूचित जातीसाठी 154 पदे असून त्यातील 77 महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी असलेल्या 64 पैकी 32 व ओबीसी संवर्गात 196 पैकी 98 सरपंचपदे महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण वर्गातील 156 पदे महिला व 155 पुरुषांसाठी आहेत. आदिवासी भागातील धारणी आणि चिखलदरा तालुक्‍यातील सर्व 115 पदे अनुसूचित जमातीकरिता राखीव असून त्यातील 58 पदे महिलांसाठी राखीव आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com