आईसह चिमुकलीचे मुक्काम पोस्ट पोलिस ठाणे, अखेर खाकीचे मन द्रवले

कैलास जगताप 
Sunday, 27 September 2020

रागाच्या भरात व बदल्याच्या भावनेतून माणसाच्या हातून एखादे कृत्य घडते. त्याची शिक्षा त्या व्यक्तीला मिळते. मात्र, रक्ताच्या नात्यालाही एका वेदनेचा सामना करावा लागतो.

पुसद (जि. यवतमाळ) : प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा खून केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिस महिलेस घेऊन पंचनामा करण्यासाठी गावी गेले. काही वेळासाठी आलेली आई आपल्याला सोडून जात असल्याचे बघून तीन वर्षीय चिमुकली बिलगून रडायला लागली. काही केल्या आईपासून दूर जायला तयार नव्हती. अशावेळी पोलिस अधिकार्‍यातील हळवे मन द्रवले. न्यायालयाच्या परवानगीने चिमुकलीला पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. येथे पोलिस कर्मचारीही वात्सल्यभावनेने त्या चिमुकलीचा सांभाळ करीत आहेत. 

रागाच्या भरात व बदल्याच्या भावनेतून माणसाच्या हातून एखादे कृत्य घडते. त्याची शिक्षा त्या व्यक्तीला मिळते. मात्र, रक्ताच्या नात्यालाही एका वेदनेचा सामना करावा लागतो. एका दुर्दैवी खुनाचा प्रसंग शहरापासून जवळच असलेल्या पूस धरणावर गेल्या सोमवारी (ता.21) घडला. गोविंद प्रल्हाद बळी या व्यक्तीचा खून करून मृतदेह धरणात फेकून देण्यात आला होता. या घटनेचा छडा पोलिसांनी लावत एका महिलेसह सहा जणांना अटक केली.

अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला
 

महिला आरोपी मृताची पहिली पत्नी होती. तिच्या प्रियकरासह मित्रांनी मिळून गोविंदला संपविले. आरोपींना अटक केल्यानंतर पंचनाम्यासाठी संशयित महिलेला घेऊन पोलिस तिच्या गावी गेलेत. परत येताना महिलेची मुलगी काही केल्या सोडायला तयार नव्हती. नातेवाइकांशी चर्चा केल्यावरही पोलिसांना या समस्येवर तोडगा सापडला नाही. चिमुकलीचे रडणे व आईसोबत येण्याचा हट्ट बघून खाकी वर्दीत असलेला ताठर चेहरा हळवा झाला.

सहायक पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांना ठाणेदार संजय चोबे यांनी ही कहाणी सांगितली. हा प्रसंग ऐकून अधिकार्‍यातील मन द्रवले. पोलिस विभागाकडून रितसर ही समस्या न्यायालयात मांडण्यात आली. चिमुकलीला आईसोबत राहण्याची परवानगी घेण्यात आली. सांभाळ करण्याची जबाबदारी पोलिसांनीच घेतली.
 

वात्सल्यभावनेने सांभाळ

चिमुकलीचा मुक्काम आईसोबत पोलिस ठाण्यात आहे. पोलिस कर्मचारीही वात्सल्य भावनेने सांभाळ करीत आहेत. तिला गादी, चादर, मास्क, सॅनिटायझर, खाऊदेखील पोलिस देत आहेत. नेमके काय घडले, याची पुसटशी कल्पना चिमुकलीला नाही. कर्तव्यकठोर असणारे पोलिसही प्रसंगी माणूस म्हणून आपली जबाबदारी पार पाडतात. हे या प्रसंगातून स्पष्ट होते.

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the permission of the court, the mother and daughter also  stay  police station