कौतुकास्पद! दिव्यांग असूनही 'तिनं' मानली नाही हार; सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर

physically disabled girl from gadchiroli climbed kalsubai peak
physically disabled girl from gadchiroli climbed kalsubai peak

गडचिरोली : गडचिरोली येथील रहिवासी करिश्मा नरेंद्र मल (माहेश्‍वरी) या दिव्यांग विद्यार्थिनीने महाराष्ट्रातील सर्वांत उंच म्हणून ओळखले जाणारे कळसूबाई शिखर सर केला. त्यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

शिवुर्जा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी 31 डिसेंबरला महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांना कळसूबाई शिखर सर करण्याची संधी दिली जाते. यावर्षी या मोहिमेत गडचिरोली येथील करिश्मा मल हिने सहभाग घेतला. 31 डिसेंबर 2020ला  दुपारी 4 वाजता कळसूबाई मातेचे दर्शन घेऊन पुढील चढाई करण्यास सर्व दिव्यांग निघाले. कळसूबाई शिखर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्‍यात असून आदिवासींचे दैवत असलेल्या कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून 1646 मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची उंची अंदाजे 900 मीटर आहे. दिव्यांगांना हे शिखर पार करण्यास जवळपास 5 तासांचा अवधी लागला. रात्रभर शिखरावर मुक्काम करून 1 जानेवारी 2021 ला नववर्षाच्या प्रथम दिनी उगवत्या सूर्याचे दर्शन घेऊन शिखर उतरण्यास सुरुवात झाली. 

पायथ्याशी असलेल्या जहागीरदार वाडी या गावी दहा वाजता त्यांच्या मोहिमेचा शेवट झाला. शिवुर्जा प्रतिष्ठान तर्फे गेल्या 9 वर्षांपासून दिव्यांगांना प्रेरणा देण्यासाठी ही मोहीम राबवली जाते. कळसूबाई शिखरावर पोहोचण्यासाठी वेळ, सुरक्षितता व येणारा मोठा खर्च दिव्यांगांना झेपू शकत नाही. त्यामुळे हे प्रतिष्ठान हे कार्य सेवाभावी वृत्तीने सतत करत आहेत. या मोहिमेत महाराष्ट्रातील 70 दिव्यांगांनी सहभाग दर्शविला होता. त्यात गडचिरोली जिल्ह्यातून करिश्मा मल हिने सहभाग दर्शवून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. सहभागी दिव्यांगांना शिवुर्जा प्रतिष्ठानतर्फे कळसूबाई शिखर सर केल्याबद्दल प्रमाणपत्र व पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. करिश्मा मल हिच्या या उत्तुंग कामगिरीबद्दल तिचे वडील नरेंद्र माहेश्‍वरी, कुटुंबीयांनी अभिनंदन केले असून सर्वच स्तरातून तिचे कौतुक करण्यात येत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com