esakal | तीर्थक्षेत्र विकासावरून मिनी मंत्रालयात घमासान
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

जिल्हा परिषदेंतर्गत ‘क' वर्ग तीर्थक्षेत्राच्या विकासाकरिता दीड कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. मात्र या कामांमधून बौद्ध धर्मियांच्या धार्मिक स्थळांना वगळण्यात आल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.

तीर्थक्षेत्र विकासावरून मिनी मंत्रालयात घमासान

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : जिल्हा परिषदेंतर्गत ‘क' वर्ग तीर्थक्षेत्राच्या विकासाकरिता दीड कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. मात्र या कामांमधून बौद्ध धर्मियांच्या धार्मिक स्थळांना वगळण्यात आल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. या मुद्यावरून जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

२४ सप्टेंबरला या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. असे असले तरी अनेक सदस्यांना अंधारात ठेवण्यात आले. क दर्जा तीर्थक्षेत्र विकासाच्या निधीतून जिल्ह्यातील अनेक बौद्ध विहारे वगळण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. बौद्ध विहारांसोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा स्थळांच्या विकासासाठी निधी टाकण्याची मागणी सदस्य अनेक दिवसांपासून करीत आहेत. मात्र त्या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आल्या, असा भाजपचा आरोप आहे. सत्ताधारी कॉंग्रेसने निधीचे समान वाटप केले नाही. आता भाजपने समान निधी वाटपाची मागणी केल्याने जिल्हा परिषदेतील राजकीय वातावरण तापले आहे.

वाचा - धक्कादायक... अल्पवयीन मुलांना ‘भाईगिरी’चे वेड; फेमस होण्यासाठी टोळीत सहभाग

वरिष्ठांच्या दबावातून गप्प
तीर्थक्षेत्र विकासनिधीच्या वाटपात भेदभाव करण्यात आला असून, यानिमित्ताने कॉंग्रेसचा खरा चेहरा उघड झाला आहे. कॉंग्रेसचे लोकप्रतिनिधी वरिष्ठांच्या दबावात मूग गिळून बसले आहेत, असा आरोप भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी केला.

आणखी वाचा - शासकीय डॉक्टरांच्या दिवाळी सुट्याही रद्द, आरोग्य विद्यापीठाचे आले पत्र

तीर्थक्षेत्र विकासनिधीत अतिशय तुटपुंजा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे पुतळा सौंदर्यीकरणासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे. एकट्या चांदूरबाजार तालुक्‍यात बौद्धविहार तसेच पुतळा सौंदर्यीकरणासाठी तब्बल 28 लाख रुपये खर्च करण्यात आले. भाजपने त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात जिल्ह्यातील पुतळा सौंदर्यीकरणावर किती खर्च केले, हे जाहीरपणे सांगावे.
-बबलू देशमुख, अध्यक्ष जिल्हा परिषद.  

संपादन - नरेश शेळके

loading image