esakal | पिस्तूल आणि जिवंत काडतुसे आढळल्याने वर्धा जिल्ह्यात खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

Pistols found in Wardha district

वानर विहिरा  गावातील गुराखी सकाळी आठच्या सुमारास गुरे चारण्याकरिता घेऊन गेला असता हिंगणा हिंगणी रोडवरील  कॅनलच्या बाजूला कव्हर बंद स्थितीत पिस्तूल तसेच तीन जिवंत काडतुस आढळले.

पिस्तूल आणि जिवंत काडतुसे आढळल्याने वर्धा जिल्ह्यात खळबळ

sakal_logo
By
मंगेश काळे

सेलू (जि. वर्धा) सेलू पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या हिंगणी बीटमधील हिंगणी ते हिंगणा रोडवरील वानर विहिरा गावाजवळील पाटबंधारे विभागाच्या कॅनलच्या बाजूला गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास एक पिस्तूल तसेच तीन जिवंत काडतुसे आढळून आल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, वानर विहिरा  गावातील गुराखी सकाळी आठच्या सुमारास गुरे चारण्याकरिता घेऊन गेला असता हिंगणा हिंगणी रोडवरील  कॅनलच्या बाजूला कव्हर बंद स्थितीत पिस्तूल तसेच तीन जिवंत काडतुस आढळले. ज्यावर मेड इन इटली असे नाव कोरले आहे. तसेच 10-161 ऑटोमॅटिक11 राउंड असलेली पिस्तूल आढळून आली.

हेही वाचा - भरचौकात हत्या झालेल्या गुंडाच्या अंत्यसंस्काराला उसळली हजारोंची गर्दी; नागपुरात गॅंगवॉर भडकण्याची शक्यता
 

गावातील महिला पोलिस पाटील यांनी सदर घटनेची माहिती सेलू पोलिस स्टेशनला देताच तत्परता दाखवीत सेलू पोलिस स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळावर रवाना होऊन स्पॉट पंचनामा करीत पिस्तूल तसेच तीन करतोस जप्त करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील गुंड प्रवृत्तीच्याअज्ञात आरोपीने पाच ते सहा दिवसांपूर्वी घटनास्थळावर  फेकले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे.

सेलू पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात 1959 नुसार भारतीय हत्यार कायदा 7, 25(1) गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी पीयुष जगताप यांच्या मार्गदर्शनात सेलू पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील गाडे तसेच पोलिस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे करीत आहेत.
 
 श्वानपथक दाखल

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर अप्पर पोलिस अधिकारी नीलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी पीयुष जगताप, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे नीलेश ब्राह्मणे, ठाणेदार सुनील गाडे, सेलू तहसीलदार महेंद्र सोनवणे तसेच वर्धा येथील श्वानपथक, नक्षलविरोधी पथक, अंगुलीमुद्रा पथक, दाखल झाले.

संपादन  : अतुल मांगे