शाळा सुरू करण्याचे नियोजन चुकीचेच; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

सुरेंद्र चापोरकर 
Sunday, 22 November 2020

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आधी वीज बिल माफीबाबत आश्‍वासन देणे आणि नंतर त्यापासून पळ काढणे ही महाविकास आघाडी सरकारची वृत्ती असून राज्य सरकार हे "पलटू सरकार' आहे. शाळा सुरू करण्याचे नियोजन चुकीचे आहे. 

अमरावती ः राज्य शासनाने कोरोना काळात शाळा सुरू करण्याबाबत कुठलेही नियोजन केलेले नाही. कोरोनाच्या भीतीने पालक धास्तावले आहेत. शाळा सुरू करण्याचा निर्णय सरसकट घेणे चुकीचे आहे. सर्वांना विश्‍वासात घेऊनच हा निर्णय घेतला पाहिजे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  केले. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी ते येथे आले होते. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

अधिक वाचा - चला मुलांनो, सोमवारपासून शाळेत या! ऑनलाईन बैठकीत घेतला निर्णय

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आधी वीज बिल माफीबाबत आश्‍वासन देणे आणि नंतर त्यापासून पळ काढणे ही महाविकास आघाडी सरकारची वृत्ती असून राज्य सरकार हे "पलटू सरकार' आहे. शाळा सुरू करण्याचे नियोजन चुकीचे आहे. 

राज्य शासनाने शिक्षकांची कोविड चाचणी स्वखर्चाने करणे गरजेचे होते. सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे की नाही याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. महाविकास आघाडी सरकारची कामगिरी पाहता सर्वत्र गोंधळात गोंधळ असून कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. वास्तविक महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष हे केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत. ही आघाडी नैसर्गिक आघाडी नसल्याने त्यामध्ये कुठलाही ताळमेळ नसल्याचे ते म्हणाले.

जाणून घ्या - स्पर्श विरहित दर्शन व्यवस्थेचा शेगाव पॅटर्न, श्री दर्शन सुरू झाल्याने भाविकांमध्ये आनंद

दरम्यान, राज्यातील शाळा सुरु करताना राज्य सरकारने सर्व गोष्टींचा निर्णय विचारपूर्वक घेण्याची गरज आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत शाळा सुरु करणं विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे शाळा सुरु करताना सरकारने आणि शाळा प्रशासनाने कोरोनाच्या सर्व निकषांचं पालन होतंय का याचा विचार करणं महत्वाचं आहे असं देवेंद्र  फडणवीस यांनी नागपुरात बोलताना म्हंटल होतं. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Planning of starting schools is failure said devendra fadanvis