रोपवनाला लागली आग; हजारो कोवळे जीव आले धोक्‍यात 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

वरोरा-चिमूर मार्गालगत वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या सालोरी उपक्षेत्रांत 2019 मध्ये राखीव वन कक्ष 14 अ मधील 50 हजार हेक्‍टर जागेत 55 हजार मिश्र रोपटे वनीकरण कार्यक्रमांतर्गत लावण्यात आले.

वरोरा (जि. चंद्रपूर)  : वनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा अंतर्गत येणाऱ्या सालोरी गावातील वनामध्ये रविवारी (ता. 31) आग लागली. या आगीत मागीलवर्षी 50 हेक्‍टर जागेत लावण्यात आलेले सुमारे 55 हजार मिश्र रोपट्यांना आगीची झळ पोहोचली. त्यामुळे ही रोपटी जगण्याची शक्‍यता कमी आहे. आग कशी लागली याचे कारण अजूनही कळले नाही. मात्र, या घटनेमुळे वनविभागाचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. 

वरोरा-चिमूर मार्गालगत वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या सालोरी उपक्षेत्रांत 2019 मध्ये राखीव वन कक्ष 14 अ मधील 50 हजार हेक्‍टर जागेत 55 हजार मिश्र रोपटे वनीकरण कार्यक्रमांतर्गत लावण्यात आले. रोपे मोठी व्हावीत, त्यांना कुठलीही इजा पोहोचू नये, याकरिता हजारो रुपये खर्च करून जाळीचे कुंपणही करण्यात आले. त्यानंतर या रोपांचे संगोपन करण्याकरिता वनविभागाने गांभीर्याने घेणे गरजेचे होते. परंतु, रविवारी सकाळी सदर रोपवनात आग लागली. आगीमध्ये 50 हेक्‍टर जमिनीतील बहुतांश रोपे सापडली. 

अवश्य वाचा- वेळेवर धावून आला `परमेश्वर` म्हणून वाचला बापलेकीचा जीव

वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळावर पोहोचेपर्यंत संपूर्ण रोपवनाला आगीने वेढले होते. एक वर्षापूर्वी रोपवन तयार करण्यात आले. येत्या काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असल्याने त्या रोपांचा मोठा फायदा होणार होता. असे असताना आग लागून संपूर्ण रोपवन नष्ट झाल्याचे दिसून येत आहे. याला वनविभागाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. ज्या परिसरातील रोपवनाला आग लागली, त्या लगतच्या वनातील एका नाल्यावर विनापरवागीने सिमेंट बंधारा बांधण्यास सुरुवात करण्यात आली होती. खोदकाम करताना त्या वनातील असंख्य झाडांची कत्तल करण्यात आली होती. कामावरील मजूरही त्या वनात राहत होते. असे असताना वनविभागास त्याची भनक लागू नये याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. वनामध्ये बंधारा बांधकाम परवानगी नसल्याने काम बंद करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी करीत आहेत.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The plantation caught fire in Salori Forestry