esakal | भंडाऱ्यात या समाजाच्या वस्तीमधील 11 कुटुंबांची परवड...दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत
sakal

बोलून बातमी शोधा

साकोली : समस्या मांडताना गोपाळ समाजातील महिला.

गेल्या अनेक वर्षांपासून नागझिरा मार्गावर गोपाळ समाजाची 11 कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांना सतत संघर्ष करावा लागत आहे. काहीजण गरिबी व लाचारीच्या गर्तेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहेत. पडक्‍या झोपडीत राहणाऱ्या या गोपाळांना अद्याप घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही.

भंडाऱ्यात या समाजाच्या वस्तीमधील 11 कुटुंबांची परवड...दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साकोली (जि. भंडारा) : शहरातील गोपाळ समाजाची वस्ती कायम उपेक्षित आणि दुर्लक्षित आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कायम दूर असलेल्या वस्तीमधील अनेकांच्या आयुष्यात अद्यापही भूक आणि दारिद्य्राशी लढण्याचा संघर्ष संपलेला नाही. मिळेल ते काम करून प्रसंगी दारोदारी फिरून भिक्षा मागून त्यांचा चरितार्थ कसातरी चालतो.

परंतु, सध्या कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीने रोजगाराचे साधनही हिरावले आहे. त्यांच्याकडे रेशन कार्डसुद्धा नसल्याने त्यांना धान्यही मिळणे दुरापास्त झाले आहे.

झोपडीतच त्यांचे वास्तव्य

गेल्या अनेक वर्षांपासून नागझिरा मार्गावर गोपाळ समाजाची 11 कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. सुज्ञ माणसाचा शहाणपणा अशिक्षितपणाच्या आड आल्याने त्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी सतत संघर्ष करावा लागत आहे. काहीजण गरिबी व लाचारीच्या गर्तेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, परिस्थितीमुळे त्यांना हतबल व्हावे लागत आहे. पडक्‍या तुटक्‍या झोपडीत राहणाऱ्या या गोपाळांना अद्याप घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. चारदोन घरी भीक मागून ते उदरभरण करतात.

केवळ सात कुटुंबांना मिळाले गॅस कनेक्‍शन

अशिक्षितपणामुळे सरकारी कार्यालयातील कागदी घोडे नाचविणे त्यांच्यासाठी डोईजड झाले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने येथील सात कुटुंबांना उज्ज्वला गॅस योजनेचे कनेक्‍शन मिळाले. परंतु उर्वरित कुटुंबांना मात्र वंचित राहावे लागले.

हेही वाचा : भंडारा जिल्ह्यात ते करताहेत राजरोस वृक्षांची कत्तल


केरोसीनही मिळेनासे झाले

गोपाळ समाजातील पंचफुला संजय शिवणकर, प्रियंका सुनील शिवणकर यांच्या केसरी कार्डवर मात्र गॅस मिळाल्याची नोंद केल्याने स्वस्त धान्य दुकानांमधून त्यांना केरोसीन मिळत नाही. सरपणासाठी लाकडेही मिळत नाही. वनविभागाचे अधिकारी अटकाव घालतात. त्यामुळे घरातील चूल कशी पेटवावी, असा प्रश्‍न त्यांच्या समोर आहे. सधन कुटुंबातील कित्येकांची नावे बीपीएल यादीत आहेत. पिवळ्या रेशन कार्डावरील धान्य ते उचलतात. गोपाळ समाजातील सर्व कुटुंबांकडे मात्र केशरी कार्ड आहे. रेशन कार्डवर फक्त तांदूळ दिला जातो. आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणीतरी मदतीला येईल का, अशी आस या कुटुंबाला लागलेली आहे.