esakal | टीप मिळाली होती दारू आणि जुगाराची अन् कारवाईसाठी आलेल्या पोलिसांना दिसले भलतेच! वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

police

चंद्रपूर -मूल मार्गावरील बोर्डा गावाजवळ गजानन निलावार यांचे मोठे फार्म हाउस आहे. निलावार ते भाड्याने देतात. निसर्गाच्या सान्निध्यातील या फार्म हाउसकडे सध्या वर्दळ चांगलीच वाढली आहे. सुट्टीच्या दिवशी येथे बरेच लोक येतात. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीही गर्भश्रीमंत घरातील काही मंडळी येथे पिकनिकसाठी पोहोचली.

टीप मिळाली होती दारू आणि जुगाराची अन् कारवाईसाठी आलेल्या पोलिसांना दिसले भलतेच! वाचा सविस्तर

sakal_logo
By
प्रमोद काकडे

चंद्रपूर : कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना मुखपट्टी (मास्क) लावणे बंधनकारक आहे. घराबाहेर मुखपटीविना पडणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतात. रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानेही स्वातंत्र्यदिनी अशीच एक कारवाई केली. ती सध्या पोलिसांच्या वर्तुळात चांगलीच चर्चेत आहे.

दारू अथवा जुगाराची "टीप' मिळाली म्हणून पोलिस पथकाने शहरानजीकच्या एका फार्महाऊसवर छापा टाकला मात्र त्यांच्या हाती केवळ मुखपट्टया न लावलेली माणसेच लागली. त्यामुळे तब्बल एक हजार रुपयांचा दंड ठोठविण्याचा सोपस्कार पार पाडून "कोरोना योद्धा"च्या भूमिकेत हे पथक मोठ्या दिमाखात माघारी आले.

चंद्रपूर -मूल मार्गावरील बोर्डा गावाजवळ गजानन निलावार यांचे मोठे फार्म हाउस आहे. निलावार ते भाड्याने देतात. निसर्गाच्या सान्निध्यातील या फार्म हाउसकडे सध्या वर्दळ चांगलीच वाढली आहे. सुट्टीच्या दिवशी येथे बरेच लोक येतात. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीही गर्भश्रीमंत घरातील काही मंडळी येथे पिकनिकसाठी पोहोचली.

परंतु, त्यांच्या स्वातंत्र्यावर विरजण टाकण्याचा प्रयत्न काही विघ्नसंतोषी लोकांनी केला. फार्म हाउस मध्ये लोक जमल्याची "टीप' रामनगर ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पथकापर्यंत पोहोचली. याबातमीने या पथकाचे कान टवकारले. गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन बोर्डाच्या दिशेने जलदगतीने रवाना झाले. आधी कानोसा घेतला आणि नंतर छापा टाकला.

एवढ्या मोठ्या संख्येत पोलिस बघून पिकनिकला आलेली मंडळी आणि फार्म हाऊसच्या व्यवस्थापकाला भर पावसातही घाम फुटला.परंतु, पोलिस आपल्या कर्तव्यापासून तसूभरही डगमगले नाही. मात्र कारवाई कशी आणि कोणती करावी, या विवंचनेत पथक सापडले. कारण टीप जुगाराची मिळाली होती. मात्र प्रत्यक्ष तसे काहीही नव्हते. अखेर फार्म हाऊसवरील उपस्थितांपैकी कुणीच मुखपट्टी (मास्क) लावली नाही, हे जवळपास अर्ध्यातासानंतर या पथकाच्या लक्षात आले.

निसर्गाच्या सानिध्यात फार्म हाउस असले तरी कोरोना येथेही पोहोचू शकतो, अशी आठवण रामनगरच्या या कोरोना योद्‌ध्यांना झाली. पोलिस आणि पार्टी करणारे यांच्यात "सामंजस्य' झाले. शेवटी मुखपट्टी न लावण्याची कारवाई म्हणून तब्बल एक हजार रुपयांचा दंड ठोठावून "कोरोना को रखना है दूर, तो मास्क लगाना है जरूर' असा संदेश देत पथक माघारी फिरले.

अधिक माहितीसाठी - दररोज तुमचे रूप दाखवणारा आरसाच तुम्हाला करू शकतो कंगाल.. कसा ते वाचा

जाता जाता फार्म हाऊसच्या मालकाला नोटीस आणि व्यवस्थापकावर मुंबई पोलिस कायद्यातंर्गत कारवाईचे सोपस्कार पार पाडले. दारू आणि जुगार असल्याची टीप मिळाली होती. परंतु, पोलिसांना मास्कच्या कारवाईवरच समाधान मानावे लागले. पोलिस पथकानेही कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून मुखपटी लावल्या होत्या. कारवाईच्या गडबडीत त्या नाकावरून डोळ्यावर सरकल्या आणि बऱ्याच गोष्टी नजरेआड गेल्या. अशा तऱ्हेने दारू आणि जुगाराची "टीप' अखेर मुख्यपट्टयांनी खोटी ठरविली... अशी चर्चा सध्या पोलिस वर्तुळात आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

loading image
go to top