अल्पवयीन मुलीच्या सोशल मीडियावर अश्‍लील व्हिडिओ; अहमदनगर जिल्ह्यातील युवकास अटक

संतोष ताकपिरे
Friday, 13 November 2020

ग्रामिण सायबर पोलिसांनी जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून 11 नोव्हेंबर 2020 रोजी विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता

अमरावती:  अल्पवयीन मुलीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अश्‍लील व्हिडिओ पाठविणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याच्या बेलापूर येथील पार्थ अनिल लोखंडे नामक युवकास ग्रामिणच्या सायबर पोलिसांनी अटक केली. जिल्हा न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात झाली. 

ग्रामिण सायबर पोलिसांनी जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून 11 नोव्हेंबर 2020 रोजी विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्याच्या काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर पार्थ ने पीडित मुलीशी चॅटिंग केली. 

अधिक माहितीसाठी - लाचखोर स्वीय सहायकाकडे आढळली लाखोंची कॅश; एसीबीची कारवाई

त्यानंतर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच दिवशी त्या मुलीच्या फोटोसह काही अश्‍लील व्हिडिओ पाठविले. पीडितेने असे व्हिडिओ टाकण्यासंदर्भात पार्थला जाब विचारला असता, त्याने सदर फोटोसह पाठविलेले व्हिडिओ इतरांना पाठविल्यास त्याला त्याचे पैसे मिळत असल्याचे तिला सांगितले. 

सदर व्हिडिओ युवतीने डिलीट करण्याबाबत त्याला सांगितले असता, पार्थने तिला नकार दिला. उलट तिची बदनामी केली. अल्पवयीन मुलीचे अखेर पालकांसह ग्रामिणच्या सायबर पोलिस ठाण्यासोबत संपर्क साधला. पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून आठ दिवसातच अहमदनगर जिल्ह्यातील पार्थ लोखंडे यास अटक केली. 

अधिक वाचा - शेतकऱ्यांना दिवाळी भेट; पीक नुकसानीचे २७ कोटी मिळाले

युवक पॉलिटेक्‍निकचा विद्यार्थी आहे. तक्रार देण्यापूर्वी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न पीडितेने केला. परंतु दुर्लक्ष केल्याने प्रकरण त्याच्या अंगलट आले.
-वीरेंद्र चौबे, 
पोलिस उपनिरीक्षक, सायबर ठाणे, अमरावती ग्रामिण.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police arrest man who shoot objectionable video of girl