हॉटेलमध्ये थांबलेल्या युवकांवर पोलिसांना आला संशय; गाडीची डिक्की उघडून बघताच सरकली पायाखालची जमीन 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 February 2021

अजय मुरलीधर शर्मा (वय32), राहुल संजुकुमार चवरे (वय23) हे दोघे महाकाली वॉर्ड, चंद्रपूर येथील निवासी आहेत. यांचा तिसरा सहकारी महेश धनराज कांबळे (35, रा. भीहापूर वॉर्ड क्रमांक 26, चंद्रपूर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या दारू तस्करांची नावे आहेत.

वणी (जि. यवतमाळ) : दारूबंदी असलेल्या चंद्रपुरातील मद्यपींचे चोचले पुरविण्यासाठी आता चंद्रपुरातील दारुतस्कर सक्रिय झाले आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवार यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे सोमवारी (ता.15) पहाटे दोन आलिशान वाहनातून तब्बल 8 लाख 80 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
        
अजय मुरलीधर शर्मा (वय32), राहुल संजुकुमार चवरे (वय23) हे दोघे महाकाली वॉर्ड, चंद्रपूर येथील निवासी आहेत. यांचा तिसरा सहकारी महेश धनराज कांबळे (35, रा. भीहापूर वॉर्ड क्रमांक 26, चंद्रपूर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या दारू तस्करांची नावे आहेत. मारेगावतील एका अनुज्ञप्ती धारकाकडून रविवारी रात्री दोन कारमध्ये दारुसाठा भरला व येथील अशोका हॉटेलसमोर एक कार तर दुसरी कार प्रगतीनगरजवळ उभी करून तस्करांनी हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. 

हेही वाचा - मेडिकलचे वसतिगृह ‘हॉटस्पॉट’; एमबीबीएसच्या १० विद्यार्थ्यांना कोरोना, विषाणूने पुन्हा डोकं वर काढले

सूर्योदयानंतर चंद्रपूरकडे मार्गक्रमण करण्याचा निर्णय घेतला. दारूतस्करीची ही माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पहाटे दोन वाजतापासून पाळत ठेवण्यात आली. हॉटेलसमोर उभ्या असलेल्या वाहनांची तपासणी करण्यात आली असता कारच्या डिक्कीत देशी दारूने भरलेले 90 मिली क्षमतेचे 10 बॉक्‍स आढळून आले.

यावेळी पोलिसांनी संशयितांना विचारणा केली असता प्रगतीनगर परिसरात दुसरे वाहन उभे करण्यात आल्याची कबुली देण्यात आली. त्या वाहनातून देशी दारूने भरलेले 90 मिली क्षमतेचे 19 बॉक्‍स आढळले. या कारवाईत 75 हजार 400 रुपयांची दारू, 8 लाख रुपये किमतीची वाहने व दोन मोबाइल संच असा एकूण 8 लाख 80 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला. 

हेही वाचा - आश्रम शाळेतील १६ विद्यार्थ्यांना अन्नातून बाधा, ३ विद्यार्थ्यांनीची प्रकृती गंभीर

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवार, ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात सपोनि संदीप एकाडे, विजय वानखडे, ईक्‍बाल शेख, रवी इसनकर, ईमान खान यांनी केली.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police caught wine smugglers from Chandrapur in Yavatmal