esakal | सजग प्रहरी, गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशा खाकी वर्दीतून माणुसकीचे दर्शन होते तेव्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Police help flood victims in Bhandara

अनेक कुटुंब पुरात अडकले होते. त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. यात जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यातील कर्मचारी अगदी आघाडीवर होते. अहोरात्र पूरग्रस्तांना मदत करून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. अनेक ठिकाणी तर पुरामुळे पोहोचणे कठीण होते. अशाठिकाणी ट्‌यूबच्या साहाय्याने पोहोचून सुरक्षित स्थळी हलविले.

सजग प्रहरी, गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशा खाकी वर्दीतून माणुसकीचे दर्शन होते तेव्हा

sakal_logo
By
दीपक फुलबांधे

भंडारा : किर्र अंधाऱ्या रात्री वैनगंगा कोपली. पुराचे पाणी छतापर्यंत टेकले. शेकडो कुटुंब पुरात अडकले. मदतीसाठी धावा करूनही कुणापर्यंत आवाजच जात नव्हता. अशा कठीणप्रसंगी धावून आले ते खाकी वर्दीतील वीर जवान. जीव धोक्‍यात घालून पुराच्या पाण्यात शिरून शेकडो पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविले. भंडारा जिल्हा पोलिस दलातील या खाकी वर्दीतील माणुसकीला पूरग्रस्तांनी कडक सॅल्यूट ठोकला.

समाजाचा सजग प्रहरी आणि गुन्हेगारांचा कर्दनकाळ असे पोलिसांबाबत म्हटले जाते. मात्र, अनेकदा पोलिसही टीकेचेच धनी होतात. एखाद्या घटनेत पोलिसांवरच ताशेरे ओढले जातात. मात्र, भंडारा जिल्ह्यात आलेल्या पुरात जिल्हा पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनी बजावलेली कामगिरी अतुलनीय आहे. रविवारची सकाळ उजाडली ती महापुराची वार्ता घेऊन. सर्वत्र हाहाकार उडाला.

वाचा - नागरिकांनो सावधान! हा जीव तुमच्या घरी तर नाही ना? असेल तर आताच काढा बाहेर.. अन्यथा..

अनेक कुटुंब पुरात अडकले होते. त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. यात जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यातील कर्मचारी अगदी आघाडीवर होते. अहोरात्र पूरग्रस्तांना मदत करून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. अनेक ठिकाणी तर पुरामुळे पोहोचणे कठीण होते. अशाठिकाणी ट्‌यूबच्या साहाय्याने पोहोचून सुरक्षित स्थळी हलविले.

जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या नेतृत्वात पोलिसांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. भंडारा शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार बंडोपंत बनसोडे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी शहरातील विविध वसाहतीत शनिवारी रात्रीच धाव घेतली.

अवश्य वाचा - हे तर जणू तुकाराम मुंढेच! नागपूरच्या नव्या आयुक्तांचा तब्बल ६६ अधिकाऱ्यांना दणका..

ग्रामसेवक कॉलनी, भोजापूर, गणेशपूर, नागपूर नाका, प्रगती कॉलनी आदी भागातील नागरिकांना बोटीच्या साहाय्याने बाहेर काढण्यास मदत केली. घरातील वृद्ध व्यक्तींना आणि लहान मुलांना अक्षरशः कंबरभर पाण्यातून उचलून आणले. तुमसर, मोहाडी, पवनी पोलिसही यात आघाडीवर होते.

चेहऱ्यावरील समाधान सर्वात मोठे अवॉर्ड

लाखांदूरचे ठाणेदार शिवाजी कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुरात आपला जीव धोक्‍यात घालून अनेकांना बाहेर काढले. सुरक्षेच्या साधनांचा अभाव असतानाही या जवानांनी पुरात शिरून अनेकांना बाहेर काढले. पोलिसांनी केलेल्या या कार्याची कुणी दखल घेतली नसली तरी पुुरातून बाहेर पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरील समाधान हे पोलिसांसाठी सर्वात मोठे अवॉर्ड होते.

हेही वाचा - ...अन् तहसीलदारांनी एक दिवसासाठी चक्क कार्यालयच आणले गावात; कोण आहे तो सरपंच? काय आहे त्याचे सेवाकार्य? वाचा

पोलिसांची धडपड

लाखांदूर तालुक्‍यातील अनेक गावांना पुराचा विळखा पडला होता. प्रशासनाची मदत पोहोचण्यास विलंब लागत होता. अशा परिस्थितीत लाखांदूर पोलिसांचे पथक गावागावांत जाऊन पूरग्रस्तांना बाहेर काढत होते. आपत्ती व्यवस्थापनाच्या तज्ज्ञांसोबत पोलिसांनीही तीन दिवस मदत कार्यात स्वतः:ला झोकून दिले होते. पूरग्रस्तांसाठी पोलिस देवदूतच ठरले. वेळीच पोलिस मदतीला धावून आले नसते तर मोठा अनर्थ घडला असता.

संपादन - नीलेश डाखोरे