
‘शोले’स्टाइल टॉवरवर चढून होमगार्डचा धुमाकूळ...
वडकी (जि. यवतमाळ) : बुधवारी (ता. १०) सकाळी ११.३० च्या दरम्यान वडकी (ता. राळेगाव) येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला होमगार्ड बालू केराम याने ‘शोले’स्टाइल करीत चक्क पोलिस ठाण्याच्या वायरलेस टॉवरवर चडून एक ते दीड तास चांगलाच धुमाकूळ घातला. ‘वडकी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलिसांनी माझ्यावर अन्याय केला. माझी ड्युटी ते लावत नाहीत’, असा आरोप करून तो टॉवरवर चढून जोरजोरात ओरडत नागरिकांना सांगत होता. वडकी तसेच परिसरातील शेकडो नागरिकांनी टॉवरवर चढून असलेल्या या शोले स्टाइल बालू केरामला पाहण्यासाठी गर्दी केली होती.
सुमारे एक ते दीड तास तो टॉवरवर चढून जोरजोराने आपल्या विविध मागण्या सांगत ओरडत होता. यावेळी पोलिसांनी त्याला टॉवरवरून उतरविण्याचा प्रयत्न केला असता तो उडी मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे त्याला टॉवरवरून उतरविण्यासाठी सगळेच कसोसिचे प्रयत्न करीत होते. अखेर त्याच्या नातेवाइकांनी त्याच्या नातेवाइकांना बोलाविण्यात आले. त्यांनी त्याची कशीबशी समजूत काढली. त्यानंतर तो टॉवरवरून उतरला व पोलिसांच्या स्वाधीन झाला. यावेळी वडकीचे ठाणेदार विनायक जाधव यांनी आपल्या कक्षात नेऊन बालू केराम याची समजूत घातली. या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.