
एका महिलेचे जावई व त्यांच्या मोठ्या भावाच्या विरोधात दाखल गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी या पोलिस कर्मचाऱ्याने चार हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती तीन हजार रुपयांवर व्यवहार निश्चित झाला. त्यामुळे संबंधित महिलेने याप्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली.
धारणी (जि. अमरावती) : एका महिलेचे जावई व त्यांचे मोठे भाऊ यांच्यावर धारणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे. मात्र, प्रकरण पुढे न वाढवता सहकार्य करण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली. सुशील गुल्हाने, असे त्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
एका महिलेचे जावई व त्यांच्या मोठ्या भावाच्या विरोधात दाखल गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी या पोलिस कर्मचाऱ्याने चार हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती तीन हजार रुपयांवर व्यवहार निश्चित झाला. त्यामुळे संबंधित महिलेने याप्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. त्यावरून सापळा रचण्यात आला.
धारणीच्या जयस्तंभ चौकातील एका प्रेसच्या दुकानात पोलिस शिपाई गुल्हाने यांनी तीन हजार रुपयांची लाचेची रक्कम पंचांसमक्ष तक्रारदार महिलेकडून स्वीकारली. त्यावेळी दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलिस शिपायाला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुशील गुल्हाने नाईक पोलिस शिपाई या पदावर कार्यरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अमरावती परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलिस उपअधीक्षक गजानन पडघन, तपास अधिकारी पोलिस निरीक्षक राहुल वसंतराव तसरे, विनोद कुंजाम, युवराज राठोड, सुनील जायेभाये व चालक सतीश किटुकले यांनी ही कारवाई केली.
धामणगावरेल्वे : येथील दुय्यम निबंधक श्रेणी-एक कार्यालयातील प्रभारी दुय्यम निबंधकासह खासगी दस्तलेखक या दोघांना पाच हजार रुपयांच्या लाचप्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती येथील कार्यालयामार्फत मंगळवारी (ता. आठ) करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ७ सप्टेंबर २०२० रोजी पडताळणीदरम्यान तक्रारदार यांचे मोठे वडील यांच्या नावाने असलेल्या जागेपैकी १/३ हिस्सा तक्रारदार व त्यांचे चुलतभाऊ यांच्या नावे करून देण्याकरिता कुंडलिक कोमल राठोड यांनी तडजोडीअंती पाच हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी (ता. आठ) कारवाईदरम्यान तक्रारदार त्यांचे व त्यांच्या चुलत भावाचे खरेदीखत आणि पावती घेण्याकरिता दुय्यम निबंधक कार्यालय, धामणगावरेल्वे येथे गेले. तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने दुय्यम निबंधक कुंडलिक राठोड यांच्या उपस्थितीत पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
संपादन : अतुल मांगे