वा रे पोलिस! गुंडांवर उफाळून आले प्रेम; रात्रभर जागून ग्रामस्थांनी पकडलेले गुंड पोलिसांनी दिले सोडून 

police released criminals after caught by people in village
police released criminals after caught by people in village

कोरची (जि. गडचिरोली) : एरवी पोलिस कर्तव्यदक्ष असले, तरी त्यालाही काही कामचुकार अपवाद असतात. असे कर्मचारी स्वत:चे कर्तव्य, तर पार पाडत नाहीत पण, इतर कुणी जिवावर उदार होऊन त्यांचे काम करून दिले, तरीही ते आपले कर्तव्य पार पाडायची तसदी घेत नाहीत. याचा प्रत्यय तालुक्‍यातील बेतकाठी येथे आला असून येथील ग्रामस्थांनी रात्रभर जागून मोठ्या शिताफीने पकडलेले दोन कुख्यात गुंड काहीही कारवाई न करता पोलिसांनी सोडून दिले. याबद्दल सखेद आश्‍चर्य व्यक्त होत असून ग्रामस्थांच्या परीश्रमाला केराची टोपली दाखवणाऱ्या पोलिसांचे या गुंडावरील प्रेम इतके का उतू जात आहे, असा प्रश्‍न आता बेतकाठीचे ग्रामस्थ विचारत आहेत.

अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त तालुक्‍यातील कोरची पोलिस स्टेशन हद्दीतील बेतकाठी येथील गावकऱ्यांनी संपूर्ण रात्र जागून दोन कुख्यात गुंडांना पकडून भाड्याच्या वाहनाने पोलिस स्टेशनमध्ये आयते आणून दिले. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल न करताच या परस्पर सोडून दिल्याने पोलिसांच्या एकूणच कार्यप्रणालीवर शंका उपस्थित केल्या जात आहेत. शिवाय अतिशय धाडसाने पकडलेल्या कुख्यात गुंडांना मोकाट सोडल्याने गावकरी प्रचंड धास्तावले आहेत. 

कोरची तालुक्‍यातील बेतकाठी येथील गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार क्रिष्णा गुरूभेलीया या शेतकऱ्याच्या घरी 13 नोव्हेंबरच्या मध्यरात्री शेळ्यांच्या गोठ्यातून शेळ्यांचा आवाज आला. त्यांनी गोठ्यात जाऊन पाहिले असता चारजण त्यांचा जवळपास 15 हजार रुपये किंमतीचा भला मोठा बोकड उचलून नेत असताना दिसले. या व्यक्तींना त्यांनी अडविले असता या चारपैकी एकाने त्यांच्या डोक्‍यावर काठीने जोरदार प्रहार केला. मात्र सुदैवाने त्याचा वार हुकला.

 त्यानंतर क्रिष्णाने आरडाओरड केल्याने घरातील सदस्य व आजूबाजूचे गावकरी जागे झाले. या चारपैकी दोनजण पळून जाण्यात यशस्वी झाले पण दोन गुंडांना पकडून ठेवण्यात ग्रामस्थांना यश आले. या दोन गुंडांना पकडून गावकऱ्यांनी अख्खी रात्र जागून काढली. सकाळी गावकरी व स्थानिक पोलिस पाटील यांनी गाव वर्गणी गोळा करून भाड्याची गाडी घेतली. त्यात या दोन आरोपींना ठेवून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कोरची पोलिस ठाण्यात आयते आणून दिले. 

या दोन्ही कुख्यात गुंडांवर गुन्हा दाखल करून उर्वरित दोघांचाही शोध घेऊन लवकरच जेरबंद करू असे, पोलिसांनी सांगितल्यानंतर गावकरी निर्धास्त होऊन आपल्या गावी परतले. मात्र, कोरची पोलिसांनी या पकडून आणलेल्या कुख्यात गुंडांवर गुन्हा दाखल न करताच त्यांना परस्पर सोडून दिले. ही माहिती ग्रामस्थांना सोमवारी (ता. 16) मिळाली. ही माहिती मिळताच ग्रामस्थांची घोर निराशा झाली. पोलिसच गुंडांना अभय देत असल्याने अख्खा गाव दहशतीत असून दाद मागायची कुठे, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

"तक्रारदार पोलिस स्टेशनमध्ये आले नव्हते. बेतकाठी येथील पोलिस पाटील दोन संबंधित व्यक्तींना घेऊन आले. त्यावेळी ताब्यात घेतलेल्या लोकांकडून चौकशी केली असता चोरी झाली नसल्याचे स्पष्ट होताच त्यांना चौकशीअंती सोडण्यात आले. ''
- विनोद गोडबोले, 
सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस ठाणे, कोरची

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com