esakal | सगळा आंधळाच कारभार! आंधळगाव पोलिस स्टेशन इमारतीचे वय तब्बल 109 वर्षे?

बोलून बातमी शोधा

police station

मोहाडी तालुक्‍यातील ब्रिटिशकालीन बाजारपेठ म्हणून आंधळगावचे नाव घेतले जाते. 1911 मध्ये ब्रिटिशांनी आंधळगाव येथे पोलिस स्टेशनची स्थापना केली होती. तेव्हापासून तब्बल 109 वर्षांनंतरही त्याच जीर्ण जर्जर इमारतीत पोलिस स्टेशन आहे

सगळा आंधळाच कारभार! आंधळगाव पोलिस स्टेशन इमारतीचे वय तब्बल 109 वर्षे?
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मोहाडी (जि. भंडारा)  : पोलिस ठाण्याची इमारतच जीर्ण झाली असेल आणि पोलिस कर्मचाऱ्यांचाच जीव धोक्‍यात असेल तर तक्रार करायची तरी कोणाकडे? असा प्रश्‍न आंधळगाव पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना पडला आहे.

तालुक्‍यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असलेल्या आंधळगाव येथील पोलिस स्टेशनचा कारभार जीर्ण इमारतीतून चालविला जात आहे. अखेरच्या घटका मोजणारी इमारत पावसाळ्यात कधी धाराशाही होईल, याचा नेम नाही. 47 गावांतील पन्नास हजार नागरिकांची सुरक्षा व सुव्यवस्था खांद्यावर असणाऱ्या ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यांनाच जीव मुठीत घेऊन काम करावे लागते.

मोहाडी तालुक्‍यातील ब्रिटिशकालीन बाजारपेठ म्हणून आंधळगावचे नाव घेतले जाते. 1911 मध्ये ब्रिटिशांनी आंधळगाव येथे पोलिस स्टेशनची स्थापना केली होती. तेव्हापासून तब्बल 109 वर्षांनंतरही त्याच जीर्ण जर्जर इमारतीत पोलिस स्टेशन आहे. उन, वारा व पावसाचा मारा झेलत या इमारतीचे हाल झाले आहेत. पावसाळ्यात जागोजागी पाणी गळू लागते. महत्त्वाचे दस्तऐवज व संगणक यांना पाणी लागू नये यासाठी पॉलिथिनचे पांघरूण घालावे लागते.

पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गावांचा परिसर मोठा आहे. रामटेक-तुमसर व मोहाडी-जांब हे वर्दळीचे मार्ग याच ठाण्याच्या हद्दीतून जातात. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर कोरोना योद्धा असणाऱ्या पोलिसांना सत्तेचाळीस गावाची सुरक्षा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. येथे एकोणचाळीस कर्मचारी आहेत. दोन पाळीत कर्तव्यावर असले तरी यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त कर्मचारी हे माजी सैनिक आहेत. त्यामुळे कर्तव्य बजावत असताना त्यांना दैनंदिन कामांसह इतर कामे करताना तारेवरची कसरत करावी लागते.

सविस्तर वाचा - आयुक्‍त मुंढेंना आता कोणी दिला इशारा?

इमारत झाली मुदतबाह्य
आंधळगाव पोलिस स्टेशनच्या इमारतीने शंभरी ओलांडली. सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षांपूर्वीच ही इमारत कालबाह्य झाली असून धोकादायक आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करण्याची गरज असल्याचा परीक्षण अहवाल पोलिस अधीक्षक कार्यालयाला दिला होता. अद्यापही पर्यायी व्यवस्था न झाल्याने त्याच इमारतीमधून पोलिस स्टेशनचा कारभार सुरू आहे. इमारतीला जागोजागी तडे गेले. छताचे आच्छादन तुटले आहे. पाऊस आला की पोलिसांना धावपळ करावी लागते. कर्मचारी जीव धोक्‍यात घालून कर्तव्य बजावत आहेत.

नव्या बांधकामाला सापडेना मुहुर्त
नवीन इमारतीच्या बांधकामासाठी जांब मार्गावर चिचोलीलगत सात एकर जागा अधिग्रहीत करण्यात आली. येथे पोलिसांच्या निवासांची सुविधा करण्याचे प्रस्तावित आहे. बांधकामासाठी सर्व सोपस्कार दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झाले. पण माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक? अद्याप बांधकामासाठी मुहुर्तच निघाला नाही. मागून निर्मित झालेल्या पोलिस स्टेशनच्या इमारती तयार झाल्या. मात्र शंभरी ओलांडलेल्या आंधळगाव पोलिस स्टेशनचा कारभार जीर्ण इमारतीतून सुरु आहे.

पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे वारंवार पत्र व्यवहार करुनही हालचाल झाली नाही. पोलिस कर्मचाऱ्याच्या जिवावर बेतल्याशिवाय गांभीर्य लक्षात घेतले जाईल का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.