पंचायत समित्यांसाठी राजकीय वातावरण तापले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

धामणगावरेल्वे पंचायत समितीच्या आठ गणांसाठी रविवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची प्रक्रिया होणार आहे. पंचायत समितीच्या आठ जागांसाठी 29 उमेदवार रिंगणात आहेत.

अमरावती : राजकीय दृष्टीने महत्त्वाच्या अशा धामणगावरेल्वे, चांदूररेल्वे तसेच तिवसा तालक्‍यात रविवारी (ता.8) पंचायत समितीसाठी मतदान होत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

आज मतदान 

धामणगावरेल्वे पंचायत समितीच्या आठ गणांसाठी रविवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची प्रक्रिया होणार आहे. पंचायत समितीच्या आठ जागांसाठी 29 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी तालुक्‍यात एकूण 116 मतदान केंद्र स्थापित करण्यात आले असून या मतदान केंद्रांवर 48 हजार 131 पुरुष व 45 हजार 737 स्त्रिया मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण मतदार संख्या एकूण 93 हजार 869 एवढी आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा भूसंपादन उपजिल्हाधिकारी मनीष गायकवाड, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार भगवान कांबळे, नायब तहसीलदार जगदीश मंडपे, नरेश इंगळे, संगणक परिचालक योगेश खरपकार, तर क्षेत्रिय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी सुमेध अलोने, भूमी अभिलेख उपअधीक्षक विलास राणे, कृषी अधिकारी सत्यशील बाभळे, उपविभागीय अभियंता अरविंद काळमेघ, गटविकास अधिकारी पंकज भोयर, सहायक अभियंता जी. एस. बंडगर, उपविभागीय अभियंता डी. एन.नखाते व आदी अधिकारी कर्तव्य बजावत आहेत. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी दत्तापूरचे ठाणेदार रवींद्र सोनवणे, मंगरुळ दस्तगीरचे दीपक वळवी, तळेगाव दशासरच्या ठाणेदार रिता उईके यांच्या मार्गदर्शनात बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

92 हजार 254 मतदार

तिवसा पंचायत समितीच्या सहा गणांसाठी 28 उमेदवार रिंगणात आहेत. एकुण 92 हजार 254 मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. बदलती राजकीय परिस्थिती तसेच रब्बी हंगामामुळे मतदारांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. या सोबतच चांदूररेल्वे पंचायत समितीच्या सहा जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात आहेत. चांदूररेल्वे पंचायत समितीमध्ये पळसखेड, मालखेड, आमला वि., घुईखेड, सातेफळ, राजुरा हे सहा सर्कल असून या निवडणुकीत कॉंग्रेस, भाजप , शिवसेना, वंचित बहुजन आघाडी हे पक्ष समोरासमोर उभे ठाकले आहेत. प्रशासनाकडून या निवडणुकीची पूर्ण तयारी झाली असून सहा सर्कलमध्ये 81 मतदान केंद्र आहे, तर या मतदान प्रक्रियेमध्ये 364 अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये 6 झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 100 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या निवडणूक प्रकियेमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी रंजित भोसले काम पाहत आहे, तर व्यवस्थापन तहसीलदार राजेंद्र इंगळे हे पाहत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The political atmosphere for the Panchayat Samitis was hot