
२३ ते ३० डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे सादर करता येणार आहेत. ३१ डिसेंबरला नामांकनाची छाननी, तर चार जानेवारीला दुपारी तीनपर्यंत नामांकन मागे घेता येणार असून त्याच दिवशी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
अमरावती : शिक्षक मतदारसंघाची राजकीय रणधुमाळी शांत होत नाही तोच आता ग्रामपंचायत निवडणुकीचा ग्रामीण भागात धुराळा उडणार आहे. अमरावती जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल फुंकण्यात आल्याने खऱ्या अर्थाने आता राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. नव्या वर्षात ग्रामपंचायत निवडणुका घेण्यात येणार आहे. त्यासाठी २३ डिसेंबरपसून नामनिर्देशन भरता येणार आहे.
कोविड-१९मुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थिती पाहता शासनाने एप्रिल ते जूनमध्ये मुदत संपलेल्या १,५६६ ग्रामपंचायतच्या निवडणुका मार्च २०२० मध्ये स्थगित केल्या होत्या. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींवर नंतर प्रशासकांची नियुक्तीसुद्धा करण्यात आली होती. मात्र आता निवडणूक घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने एक डिसेंबरला प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. सात डिसेंबरपर्यंत हरकतीचा कालावधी होता. निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार १५ डिसेंबरला तहसीलदारांकडून निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येईल. २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे सादर करता येणार आहेत. ३१ डिसेंबरला नामांकनाची छाननी, तर चार जानेवारीला दुपारी तीनपर्यंत नामांकन मागे घेता येणार असून त्याच दिवशी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाकडून घोषित कार्यक्रमानुसार १५ जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान होणार आहे. १८ जानेवारीला मतमोजणी करण्यात येईल. मतदार यादी कार्यक्रमानुसार सार्वत्रिक निवडणुकीसाठी अमरावती जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायती असून, प्रभाग १ हजार ८२३ व सदस्यसंख्या ४ हजार ८९६ आहे.
अमरावती जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींपैकी ५५३ ग्रामपंचायती निवडणुका असल्यामुळे जिल्ह्यात आचारसंहिता लागू राहील, असे जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी स्पष्ट केले आहे.
तालुका | ग्रामपंचायती | प्रभाग | सदस्य |
धामणगाव रेल्वे | 55 | 174 | 457 |
चांदूरबाजार | 41 | 140 | 381 |
चांदूररेल्वे | 29 | 93 | 235 |
नांदगाव खंडे | 51 | 159 | 419 |
चिखलदरा | 23 | 71 | 199 |
धारणी | 35 | 121 | 333 |
अचलपूर | 44 | 147 | 399 |
अंजनगाव | 34 | 117 | 312 |
वरुड | 41 | 139 | 279 |
मोर्शी | 93 | 131 | 349 |
दर्यापूर | 50 | 163 | 444 |
तिवसा | 29 | 98 | 261 |
भातकुली | 36 | 116 | 312 |
अमरावती | 46 | 154 | 416 |
संपादन - नीलेश डाखोरे