दारूतस्करीत राजकारणी-पोलिसांची हातमिळवणी...कोणी केला असा आरोप...वाचा

file photo
file photo

चंद्रपूर : काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील दारूतस्करांची बैठक झाली. यात त्यांनी क्षेत्र वाटून घेतले. एकमेकांच्या क्षेत्रात घुसखोरी करायची नाही, असे ठरले. मुख्य तस्कराकडे संबंधित तालुक्‍याची जबाबदारी राहील. त्यांच्या अधिनस्त राहून चिल्लर विक्रेते तळीरामांपर्यंत दारू पोहोचती करतील, अशी व्यवस्था आखून देण्यात आली. यामागे जिल्ह्यातील काही मोठे राजकीय नेते आणि पोलिस प्रशासनाचा आशीर्वाद आहे, असा दावा ऍड. गोस्वामी यांनी केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात 2015 पासून दारूबंदी करण्यात आली. तेव्हापासून आजवर अनेक दारूतस्करांच्या मुसक्‍या पोलिस प्रशासनाने आवळल्या. मात्र, आता दारूतस्कर संघटित झाले आहे. त्यांच्या गुप्त बैठका होत आहेत. त्यांना राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचा आशीर्वाद मिळत आहे. नवे दारूमाफिया तयार होत आहेत. याला वेळीच आवर घातला नाही तर भविष्यात संघटित गुन्हेगारी स्वरूप येईल, अशी भीतीही ऍड. गोस्वामी यांनी व्यक्त केली.

दारूबंदी अभ्यास समितीचे काय झाले?

जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दारूबंदी उठविण्याचे जाहीर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दारूबंदी अभ्यास समिती गठित केली. अहवाल पालकमंत्र्यांकडे देण्यात आला आहे. गृहमंत्री पुन्हा जनतेची मते जाणून घेऊ, असे सांगत आहेत. दारूबंदीवर शासनाने अद्याप निर्णय घेतला नाही. मात्र, दुसरीकडे दारूतस्कर रणनीती आखत आहेत. याला काही नेते आणि अधिकारी सहकार्य करीत आहे. हे अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे, असे गृहमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.


गृहमंत्र्यांना दिली तस्करांची नावे

ऍड. गोस्वामी यांनी दारूतस्करांचे क्षेत्र आणि त्यांची नावेही गृहमंत्र्यांकडे पाठविली आहे. यानुसार चंद्रपुरातील लालपेठ क्षेत्र इलियान नामक तस्करांकडे सोपविले आहे. वरोरा-भद्रावतीची जबाबदारी आंबटकर यांच्याकडे. ब्रह्मपुरी-प्यारासिंग, मूल-पटवा, चंद्रपूर-सिंकदरसिंग, घुग्घुस-दगडीसिंग मुख्य दारूतस्कर काम करतील. सोबतच मोठ्या शहरातील काही भागांचेही विभाजन करण्यात आले आहे. त्यात चंद्रपुरातील बाबूपेठ, महाकाली, रय्यतवारी असे विभाग पाडण्यात आले आहेत. या लोकांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ऍड. गोस्वामी यांनी केली आहे.

कोरोनामुक्त दारू!

मागील पाच वर्षांत तस्करांनी कोट्यवधी रुपयांची दारू या जिल्ह्यात पोहोचती केली. कोरोनामुळे टाळेबंदी लागली. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दारूतस्करी थांबली. मात्र, त्यानंतरच्या टप्प्यात दारूची दुकान सुरू करण्याची परवानगी मिळाली आणि तस्करी पुन्हा सुरू झाली. विशेष म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्यांसाठी सामान्य नागरिकांना येण्यासाठी परवानगी गरज असते. परवानगी काढून आल्यानंतरही त्यांना गृह किंवा संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाते. टाळेबंदी शिथिल झाली आहे. मात्र, जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत. सीमेवर पोलिस तैनात आहेत. येणाऱ्या-जणाऱ्यांची कसोशीने तपासणी ते करतात. "रेडझोन'मधून येणाऱ्यांवर त्यांची विशेष नजर असते. परंतु पोलिसांच्या लेखी दारूमात्र कोरोनामुक्त असावी. त्यामुळे रेडझोनमधून तस्करी सुरू असतानाही पोलिसांनी डोळ्यावर पट्ट्या बांधल्या आहेत. जिथे अर्थकारण बिघडते तिथे धाडी टाकल्या जातात. त्यातूनच एका पोलिस अधिकाऱ्याला एका दारू तस्कराने बेदम मारहाण केल्याची घटना ताजी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com