esakal | हुतात्मा स्मारकात शिरले राजकारण.. वैभवाचे दिवस पालटले, स्पर्धा परीक्षांची पुस्तके गहाळ..काय आहे प्रकार वाचा 
sakal

बोलून बातमी शोधा

politics enetred in hutatma smarak in mohadi

देशात 1942 मध्ये संपूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी असहकार आंदोलन सुरू झाले होते. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या भारत छोडो आंदोलनाची धग भंडारा व तुमसर येथे पोहोचली. त्यामुळे ग्रामीण भागात ब्रिटिश सत्तेच्या विरोधात आंदोलनांची मालिकाच सुरू झाली होती.

हुतात्मा स्मारकात शिरले राजकारण.. वैभवाचे दिवस पालटले, स्पर्धा परीक्षांची पुस्तके गहाळ..काय आहे प्रकार वाचा 

sakal_logo
By
भगवान पवनकर

मोहाडी(जि. भंडारा) : हुतात्मा स्मारकाचा विधायक कामासाठी वापर करण्यासाठी खासगी व्यक्तीने आपल्या परिश्रमाचा पैसा खर्च करून तेथे युवक व मुलांसाठी सुंदर वाचनालय तयार केले. परंतु,ही प्रगती खुपल्याने नेत्यांनी स्मारक ताब्यात घेण्यासाठी नगर पंचायतीच्या नावाने राजकारण केले. यामुळे वाचनालयातील पुस्तके गहाळ झाली असून, तिकडे कोणी फिरकेनासे झाले आहे. यामुळे येथील हुतात्मा स्मारकाच्या वैभवाचे दिवस पालटले असे दिसून येत आहे.

देशात 1942 मध्ये संपूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी असहकार आंदोलन सुरू झाले होते. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या भारत छोडो आंदोलनाची धग भंडारा व तुमसर येथे पोहोचली. त्यामुळे ग्रामीण भागात ब्रिटिश सत्तेच्या विरोधात आंदोलनांची मालिकाच सुरू झाली होती. या आंदोलनात मोहाडीचा सक्रिय सहभाग होता. स्वातंत्र्य लढ्यात येथील वीरांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांच्या स्मृती जपण्यासाठी येथे शासनाकडून हुतात्मा स्मारक उभारण्यात आले. त्यानंतर बरीच वर्ष हे स्मारक दुर्लक्षित राहिले होते. केरकचरा. घाणीचे वातावरण आणि मोकाट जनावरांचा वावर असल्याने स्मारकाची अवस्था खूप वाईट झाली होती.

हेही वाचा - दुर्दैवी! त्यांच्या नशिबी मरणानंतरही लॉकडाउन.. कित्येक दिवसांपासून कोरोनामृतांच्या अस्थी स्मशानातच 

25 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल मोहगाव देवी येथील शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ केला होता. हुतात्मा स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी शाळेकडून प्रशासनाला निवेदन दिले होते. येथील पत्रकार संघानेसुद्धा हुतात्मा स्मारकांचा कायापालट करण्यासाठी उपोषण करून लक्ष वेधले होते. अनेक संघटनांनी स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी आंदोलने केली गेली. पण प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. तत्कालीन आमदार अनिल बावनकर यांनी स्मारकाच्या दुरुस्तीसाठी थोडा निधी दिला होता. पण तो अपुरा पडला होता.

गावातील पडून असलेल्या स्मारकाचा विधायक कामासाठी वापर करण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते नरेश दिपटे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांना आपली योजना सांगितली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशामुळे ग्रामपंचायतीने हुतात्मा स्मारक श्री. दिपटे यांना हस्तांतरित केले. त्यांनी स्वनिधीतून हुतात्मा स्मारकाचे पावित्र्य जपत दुरुस्ती व रंगरंगोटी केली. याठिकाणी युवक, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची पुस्तके व इतर अभ्यासाचे साहित्य गोळा केले. स्पर्धा विषयक पुस्तकांचे संच उपलब्ध केले होते. त्यामुळे युवावर्गाचा कल या स्मारकाकडे वाढला. मात्र, त्यामुळे दिपटे यांचे नाव पुढे येत असल्याने राजकारणी नेत्यांना खुपले.

तिथे राजकीय पक्षाच्या लोकांनी राजकारण पेरले. युवकांचा राजकीय कार्यासाठी वापर करण्यात आला. यातून तुमसरच्या एका व्यक्तीने दान दिलेली स्पर्धा परीक्षेची पुस्तके परत नेली. काहींनी पुस्तके गहाळ केली. सहा कपाटे पुस्तकांविना रिकामी पडली आहेत. काही दिवसांनी नगर पंचायतीने हुतात्मा स्मारक ताब्यात घेण्यासाठी धडपड केली. लोकांच्या सहभागातून मिळालेले हुतात्मा स्मारकाचे वैभव राजकारणामुळे रसातळाला गेले. आता उरल्या सुरल्या पुस्तकांचा मुले अभ्यास करीत आहेत. पण, या स्मारकाला चांगले दिवस आले होते, ते राजकारणाचा हस्तक्षेपामुळे परत गेले आहेत. आता या हुतात्मा स्मारकाचा पुन्हा वाईट दिवसांकडे प्रवास सुरू झाला आहे.

14 ऑगस्ट 1942 ला भंडारा, तुमसर येथे पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यात तुमसर येथे चार जण शहीद झाले होते. मोठा गाजावाजा करून त्यांची अंत्ययात्रा काढू नये यासाठी तुमसरला मोठी फौज रवाना झाली. परंतु, मोहाडीच्या स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांनी बोथलीच्या नाल्याचा पूल तोडला. भंडारा-तुमसर रस्त्यावर ठिकठिकाणी लाकूड, विटा, दगड टाकून तो पूर्णपणे बंद केला होता. त्यामुळे इंग्रज सैनिक वेळेवर तुमसरला जाऊ शकले नाही. तिकडे तुमसर येथे शहीदांची अंत्ययात्रा थाटात निघाली होती.

त्यानंतर रस्ता अडविणाऱ्यांचे अटकसत्र चालवले होते. या आंदोलनात किसन लाल डागा, स. ना. रोकडे, सूरज रतन डागा, सहसराम कटकवार, किसनलाल बागडी, गणपत तरारे, अब्दुल सत्तार इस्माईल सिद्धीकी, नामदेव श्रीपाद, बाजीराव निखारे, नत्थू मनगटे, हिराजी श्रीपाद, दामू डेकाटे, नत्थू आकरे, फत्तू पाटील, मिरगू मोटघरे, रामनाथ कळंबे, नेतराम चुरे आणखी 18 लोकांना अटक केली होती. यातील अनेकांना स्थानबद्ध व कारावास झाला होता. चले जाव आंदोलनात मोहाडीचे काशिनाथ कळंबे हे शहीद झाले होते.

क्लिक करा - विश्वास बसेल का? या गावात मिळते मोफत पाणी आणि मोफत दळण..नागरिकांना दर्जेदार सुविधा.. स्मार्ट सरपंचाचे स्मार्ट गाव..वाचा या गावाची यशोगाथा


"जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे ग्रामपंचायतीने स्मारक सोपवले होते. तेथे मी स्वत:च्या खर्चातून रंगरंगोटी, स्पर्धा परीक्षेची पुस्तके, वीजपुरवठा व सौंदर्यिकरण केले होते. परंतु, येथे येणाऱ्या युवकांचा राजकीय उद्देशाने वापर केल्यामुळे पुस्तके गहाळ झाली आहेत".
-नरेश बाबू दिपटे
मोहाडी.

"हुतात्मा स्मारक ग्रामपंचायतीने खासगी व्यक्तीला कधीच सोपवले नाही. तेथे फक्त वाचनालय सुरू केले होते. हे नगर पंचायतीकडेच आहे".
-सुनील गिऱ्हेपुंजे
उपाध्यक्ष, नगर पंचायत मोहाडी.

संपादन - अथर्व महांकाळ