
चार दिवसांपूर्वी गोरेगावपासून डांबरीकरण रस्ता बांधकाम सुरू करण्यात आले. डांबरीकरण गोरेगाव ते एमसीपी शाळेपर्यंत सुव्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. परंतु, याच शाळेपासून निकृष्ट साहित्याचा वापर केल्याने गिट्टी आणि खडी बाहेर येऊन रस्त्यावर खड्डे पडू लागले आहेत.
गोरेगाव (जि. गोंदिया) : गोरेगाव ते ठाणा मार्गावर बोटे गावापर्यंत डांबरीकरण रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामात कंत्राटदाराने निकृष्ट साहित्याचा वापर केल्याने दोन दिवसांतच रस्त्यावर साहित्य उखडून खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्ता बांधकाम कंत्राटदाराच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गोरेगाव ते ठाणा मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने खड्डे बुजवून डांबरीकरण करा, अशी हाक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना राजकीय पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी मारली होती. डांबरीकरण रस्ता गोरेगाव ते बोटे गावापर्यंत मंजूर करण्यात आला. परंतु, या विभागाला काम सुरू करण्याचा मुहूर्त सापडत नव्हता.
दरम्यान, अवघ्या चार दिवसांपूर्वी गोरेगावपासून डांबरीकरण रस्ता बांधकाम सुरू करण्यात आले. डांबरीकरण गोरेगाव ते एमसीपी शाळेपर्यंत सुव्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. परंतु, याच शाळेपासून निकृष्ट साहित्याचा वापर केल्याने गिट्टी आणि खडी बाहेर येऊन रस्त्यावर खड्डे पडू लागले आहेत. त्यामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. या रस्त्यावर एखाद्या मोठ्या अपघाताची शक्यताही व्यक्त होत आहे.
गोरेगाव ते ठाणा मार्गावर असलेल्या बोटे गावापर्यंत डांबरीकरणाचे कंत्राट सार्वजनिक बांधकाम विभागाने आनंद कंस्ट्रक्शन कंपनी गोंदियाला दिले आहे. त्यामुळे रस्त्याचे निर्माण कार्य सुरू करण्यात आले. परंतु, संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी या कामाची पाहणी केली नसल्यानेच कंत्राटदारांनी निकृष्ट साहित्याचा वापर केल्याची चर्चा आहे. अभियंत्यांच्या निष्काळजीपणामुळे ठरवून दिलेली रस्त्यावरची उंची कमी-जास्त करण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
दोषींवर कारवाई करणार
गोरेगाव ते बोटेपर्यंत डांबरीकरणाचे बांधकाम सुरू आहे. यात तयार झालेल्या कामांची पाहणी करून निकृष्ट आढळल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल. पुन्हा बांधकाम करण्याचे आदेश देण्यात येईल.
- श्री. जावेद, कार्यकारी अभियंता, गोंदिया.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)