
कोरोनानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसणार, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. त्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थी आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत.
अमरावती : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा, बंदिस्त झालेले जीवन, खेळावर आलेल्या मर्यादा या सर्व कारणांनी चिमुकल्यांच्या बालमनावर विविध प्रकारचे मानसिक आघात होत असल्याचे मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सतत घरी राहिल्याने एकलकोंडेपणा, आक्रमकता तसेच भांडखोरवृत्ती वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
कोरोनानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसणार, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. त्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थी आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत. खेळ बंद असल्याने मानसिक व भावनिक निचरा होत नाही. पर्यायाने आपल्या भावंडांसोबत भांडण करणे, वादविवाद करणे अशा अनेक मानसिक प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असल्याचे मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
ऑनलाइन शिक्षणाचा दुष्परिणाम म्हणजे शिक्षणाव्यतिरिक्त अन्य कामांसाठी मोबाईल वापरण्याच्या वेळेत वाढ झाली आहे. गेमिंग, चॅटिंग यासारखे प्रकार वाढीस लागले आहेत. विशेष म्हणजे मोबाईलवरील ऑनलाइन वर्ग झाल्यानंतर मनोरंजन म्हणून विद्यार्थी टीव्हीडे वळले. त्यातून मग एकलकोंडेपणा, चिडचिडेपणा, भांडखोरवृत्ती बळावत आहे.
विद्यार्थ्यांची भावनिक कोंडी
शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची भावनिक कोंडी होत आहे. शाळेत मित्रांसोबत असताना तसेच खेळताना त्यांचा व्यायामासोबतच ताणतणावसुद्धा हलका होत असे. मात्र, वर्षभरापासून या सर्वांना ब्रेक लागला आहे. मुलांना किमान तासभर तरी आपल्या परिसरातील बागेत जाण्यास परवानगी देऊन खेळायला लावणे, मित्रांशी खेळू देणे असे प्रयोग पालकांनी करावे, मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळूनच.
- डॉ. अमोल गुल्हाने,
मानसोपचारतज्ञ
मुलांना क्रिकेट, बॅडमिंटन यासारखे सोशल डिस्टन्सिंगचे खेळ खेळायला लावणे. त्यामुळे स्क्रीन टायमिंग कमी करण्यात मदत होईल. कुटुंबातील सदस्यांनी चिमुकल्यांच्या भावना ऐकून घेणे, लहानग्यांना झेपेल अशी घरगुती कामे करू द्यावी. त्यामुळे त्यांची करमणूक तर होईल शिवाय जबाबदारीचेही भान येईल. लहान-मोठ्यांनी एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा. चिमुकल्यांना एकदमच दुर्लक्षित करता कामा नये.