घरी गणेश मूर्ती पाण्यात विरघळल्या नाहीत... नो प्रॉब्लेम, त्यांना इथे घेऊन या!  

रुपेश खैरी 
Monday, 7 September 2020

दरवर्षीप्रमाणे यंदाही वैद्यकीय जनजागृती मंचच्या वतीने हनुमान टेकडीवरील ऑक्‍सिजन पार्कवर विसर्जनाची सोय करण्यात आली होती. येथे आलेल्या 45 टक्‍के मूर्ती या पीओपीच्या होत्या.

वर्धा : यंदा कोरोना संसर्गाच्या कारणाने अनेकांनी जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरीच गणेश विसर्जन केले. यात बाजारात असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या अनेक मूर्ती पाण्यात विरघळल्या नाहीत. त्या आहे तशाच आहेत. आता या मूर्तींचे विसर्जन कसे करावे, या चिंतेत नागरिक आहेत. त्यामुळे नागरिकांनी कुठलीही भीती न बाळगता त्या मूर्ती वैद्यकीय जनजागृती मंचच्या धाम कुंडात आणून द्याव्या, असे आवाहन करण्यात आले आहे. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही वैद्यकीय जनजागृती मंचच्या वतीने हनुमान टेकडीवरील ऑक्‍सिजन पार्कवर विसर्जनाची सोय करण्यात आली होती. येथे आलेल्या 45 टक्‍के मूर्ती या पीओपीच्या होत्या. या मूर्तींचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत कमी झाल्याने समाधान व्यक्‍त करण्यात येत आहे.

अवश्य वाचा - अविश्वसनीय! विदर्भातील या गावात चक्क डायनासोर द्यायचे अंडी: काही वर्षांपूर्वी सापडले होते अवशेष 
 

ही बाब येथील विसर्जन कुंडाची स्वच्छता करताना पुढे आली. यातूनच हा निर्णय घेण्यात आला. या मूर्ती येथे जेसीबीने मोठा खड्डा खोदून पुरण्यात येत आहेत, तर मातीच्या मूर्तींपासून निर्माण झालेली माती ही गणेश मूर्तिकारांसाठी ठेवण्यात आली आहे. 
 
अधिक माहितीसाठी - .. तर विदर्भात महापूर आलाच नसता.. महापुराला जबाबदार कोण? ऐतिहासिक विसर्ग करण्याची खरंच गरज होती का? 
 

४५ मूर्ती आल्या कुंडात 

गणेशोत्सवादरम्यान दीड ते १० दिवसात घरी विसर्जन केलेल्या तब्बल ४५ मूर्त्या पाण्यात विरघळल्या नाहीत. त्या काही भाविकांनी येथील वैद्यकीय जनजागृती मंचच्या कुंडात आणून शिरवल्या. हा अनुभव लक्षात घेता घरी विसर्जित करून न विरघळलेल्या बाप्पाच्या पीओपी मूर्त्यांची योग्य विल्हेवाट लावणे शक्‍य नसल्यास त्या येथे आणाव्या आणि पुढील उत्सवात हे टाळण्यासाठी १०० टक्‍के मातीची मूर्ती घेण्याचा संकल्प आताच करावा, असे आवाहन वैद्यकीय जनजागृती मंचातर्फे करण्यात आले आहे.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pop Ganesh Murtis not dissolved in the water...