‘प्रभात’चे ‘स्मरत बलिदानम्’ अव्वल ठरल्याची गोष्ट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

national flag Tiranga

‘प्रभात’चे ‘स्मरत बलिदानम्’ अव्वल ठरल्याची गोष्ट!

‘स्वातंत्र्यमूल्य... सकाळचं कोवळं ऊन

भारतीय मनाचा सच्चा नि समंजस भाव

दार उघडत नाही, तोवर बाहेर तिष्ठत राहणारा

उघडलं; की, सगळीकडे लख्ख प्रकाश!

आपणही असेच... आपलं स्वातंत्र्य वाटणारं.,

स्वातंत्र्याच्या स्मृतीचं मोठेपण... देशाला जागविणारं!’

प्रा. डॉ. सुहास उगले

स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी नव्या पिढीतही राहावी यासाठी ‘प्रभात’मधील संस्कृत शिक्षक मधुकर आटोळे यांनी संस्कृत बालनाट्य ‘स्मरत बलिदानम्’चं नाट्यलेखन केलं. नाटकाची थीम होती... जालियनवाला बाग हत्याकांड! भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचा बिंदू असलेल्या जालियनवाला बाग हत्याकांड घटनेला १०३ वर्षे झालीत. इंग्रजांच्या राजवटीचा हा निर्घृणतेचा कळसच होता. हा स्वातंत्र्याच्या ट्रिगर पॉईंट ठरला. भारतातील ब्रिटिश राजच्या अखेरीची ही सुरुवात ठरली.

दिनांक १ व २ ऑगस्टला बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखा आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ यांच्या वतीने आयोजित विदर्भस्तरीय बालनाट्य स्पर्धेत अकोला येथील प्रभात किड्स स्कूलच्या ‘स्मरत बलिदानम्’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. तसं पाहिलं तर, संस्कृत नाटकं भारतीय नाट्यपरंपरेचा आधार आहे. महाकवी कालिदासाचे ‘शाकुन्तलम्’ हे केवळ नाटक नाही, तर विश्व आणि भारतीय संस्कृतीचा समुद्र आहे. ज्ञान-विज्ञानाचे भांडार, हजारो वर्षांची परंपरा असलेल्या संस्कृत भाषेची शाळांमधील आणि एकंदरीतच स्थिती आशादायक असेलच असे नाही.

सध्या शालेय स्तरावर ‘स्कोअरिंग’ विषय म्हणून संस्कृतकडे पाहिले जाते. मात्र, त्या पलीकडे जाऊन संस्कृतही भाषा म्हणून शिकण्याची गरज व महत्त्व पटविणारी व ‘भाषा-भगिनींची संकल्पना’ प्राधान्याने राबविणारी अकोल्यातील प्रभात किड्स स्कूलने अग्रक्रमावर असलेले स्थान शाबूत ठेवून ‘स्मरत बलिदानम्’च्या माध्यमातून संस्कृत विषय आणि संस्कृत नाट्यक्षेत्रात शिरपेचातील मानाचा तुरा खोवला आहे.

आधुनिक तंत्रज्ञान, मोबाईल, टि्वटर इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲपच्या आहारी जाणाऱ्या नव्या पिढीतल्या शाळकरी विद्यार्थ्यांना ‘स्मरत बलिदानम्’ मधील अनुभव स्फूर्तिदायक होता. संस्कृत विषय असलेल्या, त्यामध्ये अभिरुची असलेल्या विद्यार्थ्यांकडून संस्कृत भाषेतील नेमके उच्चार, भावाभिव्यक्ती, सादरीकरण हे सगळं मोठे आव्हानच होतं. ते संस्कृत विभागातील शिक्षकांनी परिश्रमपूर्वक पेललं. सांस्कृतिक विभागाने त्यांच्या कसदार प्रयत्नातील वैभवात परंपरेप्रमाणे भर टाकली.

दिमतीला ज्येष्ठांचं मार्गदर्शन व प्रेरणा तसेच नाटकातील सुयोग्य प्रॉपर्टी, भावनात्मकतेचे सूक्ष्म दर्शन घडविण्यासाठी पैलू पाडण्याचं खडतर आव्हान तर होतंच, ते इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी निष्ठेनं पेललं. याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःच्या सुप्त क्षमतांचा शोध लागला; स्वतःचा विकास घडवून आणता आला.

‘स्मरत बलिदानम्’ मधील संस्कृत शब्द, त्यांची अचूक संवादफेक करणं, ऐतिहासिक प्रसंगाशी तादात्म्यता, जो अनुभव व थरार, त्याचे सादरीकरण स्टेजवर करणे, स्वातंत्र्यमूल्याचा भाव जपणं हे नव्या पिढीत येतेय हे पाहाणं, तेवढी लहान वयात स्वातंत्र्याच्या किमतीची मेंदूत होणारी बांधणी पक्की होत जाणं, हे सर्व दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत या सर्वांचा कस लागणं ही फार मोठी कसरत कुशलतेने हाताळण्यासाठी प्रभातचे संचालक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. गजानन नारे यांनी अस्सल प्रेरणातंत्राचा वापर केला.

मेंदूमधील पेशींची परस्पर जुळणी आणि बालकाचा शारीरिक नि मानसिक विकास, या दोन्ही प्रक्रिया परस्परावलंबी असतात. ‘प्रभात’ने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधण्यातील नावीन्यपूर्ण उपक्रमशीलता जपल्यामुळे असे यश प्राप्त केल्या जाते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा होत असताना संस्कृत नाट्यपरंपरेतील मजबूत पाया घालण्याचं काम ‘प्रभात’ने केलं आहे; ही घटनाच अकोल्याच्या सांस्कृतिक वैभवाला सुखावणारी म्हणायला बराचसा वाव आहे!

Web Title: Prabhat Sanskrit Teacher Contribution Freedom

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..