प्रदीप तुंबडे 'वर्ल्डकप'साठी सांख्यिकीतज्ज्ञ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जून 2019

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महापालिकेत कार्यरत नागपूरचे प्रदीपकुमार तुंबडे यांची रेडिओ समालोचनासाठी सांख्यिकीतज्ज्ञ म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे.

नागपूर : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महापालिकेत कार्यरत नागपूरचे प्रदीपकुमार तुंबडे यांची रेडिओ समालोचनासाठी सांख्यिकीतज्ज्ञ म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे.

रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात व्यवस्थापक असलेले तुंबडे विश्‍वचषकातील भारत-पाक लढतीसह एकूण चार सामन्यांमध्ये सांख्यिकीतज्ज्ञ म्हणून काम पाहणार आहेत. यात ऑस्ट्रेलिया-श्रीलंका (15 जून), भारत-पाकिस्तान (16 जून), वेस्ट इंडीज-बांगलादेश (17 जून) आणि इंग्लंड-अफगणिस्तान (18 जून) सामन्याचा समावेश आहे.

बीसीसीआयच्या पॅनेलवर असलेले तुंबडे लागोपाठ पाचव्या विश्‍वकरंडकात सांख्यिकीतज्ज्ञ किंवा स्कोअरर म्हणून भूमिका बजावणार आहेत. तुंबडे यांनी आतापर्यंत 86 कसोटी, एकदिवसीय व टी-20 सामन्यांमध्ये स्कोअरर व सांख्यिकीतज्ज्ञ म्हणून काम पाहिले आहे. 1985-86 मध्ये भारत-श्रीलंका कसोटी सामन्यात त्यांनी पहिल्यांदा "स्कोअरिंग' केले होते. याशिवाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ते डीएलस (डकवर्थ-लुईस) मॅनेजर म्हणून काम पाहिले आहे.

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत काम करण्याची पाचव्यांदा संधी मिळाल्याबद्दल तुंबडे यांनी आनंद व्यक्‍त केला. ही आपल्यासाठी फार मोठी संधी असल्याचे त्यांनी "सकाळ'ला सांगितले. तुंबडे यांनी नियुक्‍तीचे श्रेय महापौर नंदा जिचकार, आयुक्‍त अभिजित बांगर, विदर्भ क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी व मित्रपरिवाराला दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pradip Tumbade is Numerical expert for World Cup